नाशिक : एमबीबीएस व बीडीएस वगळता अन्य वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी महाविद्यालय निवडीचा प्रेफरन्स फॉर्म भरण्याची प्रक्रिया गुरुवार (ता. ३)पासून सुरू होत आहे. येत्या १० डिसेंबरपर्यंत मुदत असून, १२ डिसेंबरला पहिली निवडयादी जाहीर होणार आहे.
पहिली निवड यादी १२ ला
आयुर्वेद (बीएएमएस), होमिओपॅथी (बीएचएमएस), युनानी (बीयूएमएस), फिजिओथेरपी (बीपीटीएच) यांसह बीओपीएच, बीएएसएलपी, बी (पी ॲन्ड ओ) आणि बी. एस्सी (नर्सिंग) या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. याअंतर्गत बुधवारी (ता.२) जागांचा आरक्षणनिहाय तपशील (सिट मॅट्रिक्स) जाहीर करण्यात आला. तसेच राज्यस्तरावरील कोट्याच्या जागांसाठीची तात्पुरती गुणवत्तायादी जाहीर केली जाणार होती. पुढील प्रक्रियेत सहभागी होताना विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवायचे आहे.
महाविद्यालयात प्रवेश निश्चिती १३ ते २१ डिसेंबर मुदत
या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन स्वरूपात पसंतीक्रम नोंदविण्यासाठी गुरुवार (ता.३) पासून १० डिसेंबरला रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत वेळ असेल. नोंदविलेल्या पर्यायांनुसार पहिली निवडयादी १२ डिसेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. यादीत नावे असलेल्या विद्यार्थ्यांना निवड झालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चितीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १३ ते २१ डिसेंबर अशी मुदत असेल. सद्यःस्थितीत पहिल्या फेरीपर्यंतचे वेळापत्रक प्रसिद्ध केले असले तरी लवकरच पुढील फेऱ्यांचा तपशील जारी केला जाणार आहे.
हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची
फिजिओथेरपी, नर्सिंगच्या जागांत वाढ
सध्या उपलब्ध जागांपैकी फिजिओथेरपीच्या अभ्यासक्रमासाठी ८०, तर नर्सिंगच्या दोनशे जागांमध्ये वाढ झाली आहे. परवागीसाठीची प्रक्रिया पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या दिंडोरी रोडवरील नवीन महाविद्यालयात ५०, तर नंदुरबार येथील महाविद्यालयात ३० अशा ८० जागा फिजिओथेरपीसाठी वाढतील. तर नर्सिंगची पाच महाविद्यालये वाढली असून, यातून दोनशे जागा वाढतील. संगमेश्र्वर (जि. रत्नागिरी), करवीर (जि. कोल्हापूर), दिंडोरी रोड (जि. नाशिक), नंदुरबार, दरयानपूर (जि. अमरावती) अशा पाच नवीन महाविद्यालयांत प्रत्येकी चाळीस जागा उपलब्ध असतील.