वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांना मिळणार हिवाळी सुट्ट्या; विद्यापीठाचा निर्णय

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांना हिवाळी-2020 सुट्या रद्द केल्याचे परीपत्रक विद्यापीठाने जारी केले होते. हे परीपत्रक रद्द ठरवतांना स्थानिक परीस्थितीचा अंदाज घेत हिवाळी सुट्यांबाबत निर्णय घेण्याच्या सूचना संबंधित महाविद्यालयाचे अधिष्ठाता, प्राचार्य यांना विद्यापीठाने सुधारीत परीपत्रकातून केल्या आहेत.

पन्नास टक्‍के अध्यापक उपस्थित असणे आवश्‍यक

गेल्या 20 ऑक्‍टोबरला जारी परीपत्रकात सुट्या रद्द करत असल्याबाबत विद्यापीठाने कळविले होते. परंतु यानंतर नुकतेच जारी केलेल्या परीपत्रकानुसार यापूर्वीचे परीपत्रक रद्द केले असल्याची माहिती कुलसचिवांनी दिली आहे. अध्यापकांना तीस दिवस सुट्या अनुज्ञेय असतात. त्याला अनुसरून कोविड-19 महामारीच्या अनुषंगाने स्थानिक स्तरावरील परीस्थितीचा अंदाज घेत, महाविद्यालयाच्या अधिष्ठाता, प्राचार्य यांनी हिवाळी-2020 सुट्यांबाबतचा निर्णय महाविद्यालय स्तरावर घ्यावा. निर्णयाबाबतची माहिती विद्यापीठाला कळवावी. सुट्यांच्या कालावधीत महाविद्यालयीन, रूग्णालयीन कामकाजाच्या अनुषंगाने एकूण अध्यापक वर्गापैकी पन्नास टक्‍के अध्यापक वर्ग उपस्थित असणे आवश्‍यक असेल. यासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिष्ठातांना पत्र पाठवत माहिती दिली आहे.