वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांना हिवाळी सुट्या 

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांना हिवाळी-२०२० सुट्या रद्द केल्याचे परिपत्रक विद्यापीठाने जारी केले होते. हे परिपत्रक रद्द ठरविताना स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेत हिवाळी सुट्यांबाबत निर्णय घेण्याच्या सूचना संबंधित महाविद्यालयाचे अधिष्ठाता, प्राचार्यांना विद्यापीठाने सुधारित परिपत्रकातून केल्या आहेत. 

आरोग्य विद्यापीठाचे प्राचार्य, अधिष्ठातांना सूचना 
गेल्या २० ऑक्‍टोबरला जारी परिपत्रकात सुट्या रद्द करत असल्याबाबत विद्यापीठाने कळविले होते; परंतु यानंतर नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकानुसार यापूर्वीचे परिपत्रक रद्द केल्याची माहिती कुलसचिवांनी दिली. अध्यापकांना तीस दिवस सुट्या अनुज्ञेय असतात. त्याला अनुसरून कोविड-१९ महामारीच्या अनुषंगाने स्थानिक स्तरावरील परिस्थितीचा अंदाज घेत, महाविद्यालयाच्या अधिष्ठाता, प्राचार्यांनी हिवाळी-२०२० सुट्यांबाबतचा निर्णय महाविद्यालय स्तरावर घ्यावा.

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

निर्णयाबाबतची माहिती विद्यापीठाला कळवावी. सुट्यांच्या कालावधीत महाविद्यालयीन, रुग्णालयीन कामकाजाच्या अनुषंगाने एकूण अध्यापक वर्गापैकी ५० टक्‍के अध्यापक वर्ग उपस्थित असणे आवश्‍यक असेल. या संदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिष्ठातांना पत्र पाठवत माहिती दिली आहे. 

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी