वैद्यकीय महाविद्यालयासाठी महापालिका देणार मोफत जागा; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव सादर

नाशिक : राज्य शासनाने नाशिकसाठी मंजूर केलेल्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला आरोग्य विज्ञान विद्यापीठासमोरील जागा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पब्लिक ॲमेनिटीजचे आरक्षण हटविण्याबरोबरच जागा महापालिकेने मोफत देण्याची तयारी दाखविल्याने वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामाला गती मिळणार आहे. 

वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामाला गती
आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत अध्यापन व संशोधन, विशेषोपचार सेवा उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यासाठी सुमारे ६२७. ६२ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव सादर केला होता. विद्यापीठ अधिनियमानुसार अभ्यासक्रमांचे शुल्क निश्चित करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारने अर्थसंकल्पात वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाने तत्काळ भुसंपादन करण्यासाठी महापालिकेला पत्र सादर केले आहे.

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

आरक्षण हटविण्यासंदर्भात पत्रव्यवहार

आरोग्य विज्ञान विद्यापीठासमोर म्हसरूळ शिवारातील गट नंबर २५७ मध्ये १४ हेक्टर ३१ आर महापालिकेची जमीन आहे. त्यावर २०१७ च्या शहर विकास आराखड्यात पब्लिक ॲमेनिटीजसाठी जागा राखीव करण्यात आली आहे. आता त्या जागेवर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय होणार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आरक्षण हटविण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार महासभेवर प्रस्ताव सादर करण्यात आला असून, जागा मोफत देण्याची तयारी महापालिकेने दर्शविली आहे. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO