व्यापाऱ्याचा सहा लाखांचा कांदा परस्पर विकला; चौघे पोलिसांच्या ताब्यात 

येवला (जि. नाशिक) : संगनमताने बनावट नंबर प्लेट, मोबाईल नंबर वापरून कांदा व्यापाऱ्यांचा सहा लाख ३२ हजार ४६ रुपयांचा कांदा ट्रकची नंबर प्लेट बदलून परस्पर विकून फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १८ लाख ५८ हजारांचा ऐवज जप्त केला.

येथील कांदा व्यापारी सुमीत समदडिया यांचा अमोल ट्रेडिंग कंपनीचा सुमारे सहा लाख ३२ हजार ४६ रुपयांचा ५२९ गोणी कांदा संशयितांनी परस्पर विकला. संशयितांनी इतर व्यक्तींच्या नावावर असलेले सीमकार्ड व मोबाईल वापरून तसेच ट्रान्स्पोर्ट मालकाला दूरध्वनी करून ट्रकला बनावट नंबर प्लेट लावली. संगनमताने कांदा व्यापारी समदडिया यांचा अमोल ट्रेडिंग कंपनीचा एकूण सहा लाख ३२ हजार ४६ रुपयांचा कांदा ओडिशा (कोयका बाजार) येथील चंदनेश्वर एन्टरप्रायजेस येथे पोच करण्यासाठी विश्वासाने गाडीत भरून दिला. मात्र कांदा ओडिशा येथे पोच न करता परस्पर कोठेतरी विक्री करून विश्वासघात करून फसवणूक केली. या प्रकरणी समदडिया यांच्या फिर्यादीवरून संशयित प्रवीण अहिरे (रा. श्रीरामनगर, नाशिक), सादिक पटेल (रा. संजयनगर, पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे), पंकज ऊर्फ बंदी शिंदे (रा. आडगाव, जि. नाशिक) व इतर दोन अल्पवयीन युवकांसह पिंपळनेर (ता. साक्री) येथील इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपासात प्रवीण अहिरे यास ताब्यात घेतले असता सादिक पटेल या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने कांदा उतरून घेत विकण्याची व्यवस्था करून कांदा सटाणा येथे विक्री केल्याचे उघड झाले. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO 

संशयितांकडून ३० हजारांची रोकड, दहा हजारांचा रिअल मी कंपनीचा फोन, दहा हजारांचा व्हिवोचा मोबाईल, चार हजारांचा ओप्पोचा मोबाईल, १५ लाखांचा ट्रक (एमएच-१५, जीव्ही ८२२५), तीन लाखांची इंडिगो (एमएच ०२ सीआर ६०३३) असा एकूण १८ लाख ५८ हजारांचा ऐवज शहर पोलिसांनी जप्त केला. पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण अधिक तपास करत आहेत.  

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड