नाशिक : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतलेल्या सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर होऊ लागले आहे. येत्या ५ डिसेंबरपर्यंत सर्व सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर केले जाणार असून, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कॅप राउंडची प्रक्रिया राबविली जाणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
हॉटेल मॅनेजमेंट सीईटीचाही समावेश
सीईटी सेलतर्फे यापूर्वी घेतलेल्या सीईटी परीक्षांच्या निकालाची घोषणा केली जात आहे. सर्वांत आधी एमएएच-आर्क-सीईटी २०२० या आर्किटेक्चरच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सीईटी निकालाची घोषणा केली होती. त्यापाठोपाठ हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेतलेल्या एमएएच-बी.एचएमसीटी-सीईटी, एमएएच-एम.एचएम-सीईटी परीक्षेचा निकालदेखील जाहीर केला आहे. शिक्षणशास्त्र शाखेतील एमएएच-बी.एड.-एम.एड.(इंटिग्रेटेड) सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, बारावीनंतर बी.एड. व एम.एड. संयुक्त अभ्यासक्रमाला उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.
प्रवेशप्रक्रियेला मिळणार गती
एमएएच-एम.एड. सीईटी, एमएएच-बीए बी.एस्सी.-बी.एड. (इंटिग्रेटेड) २०२० सीईटी, एमएएच-बीपीएड, एमएएच एमपीएड. सीईटी परीक्षांचाही निकाल जाहीर झाला आहे. बारावीनंतर विधी शाखेतील पाच वर्षे कालावधीच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतलेल्या सीईटी परीक्षेचाही निकाल जाहीर केला आहे. या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असल्याने आता यापुढील प्रवेशप्रक्रियेच्या टप्प्यातील कॅप राउंडच्या प्रक्रियेला गती प्राप्त होणार आहे. कॅप राउंडच्या माध्यमातून सीईटी परीक्षेतून प्रवेशाची पात्रता मिळविलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची निवड करून, प्रवेश निश्चितीची प्रक्रिया पार पाडायची आहे.
हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली
एमएचटी-सीईटी परीक्षेच्या
निकालाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा
दरम्यान, विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर होत असले तरी विद्यार्थी पालकांचे लक्ष एमएचटी-सीईटी परीक्षेच्य निकालाकडे लागून आहे. या सीईटीच्या गुणांच्या आधारावर अभियांत्रिकी (बी.ई.), औषधनिर्माणशास्त्र (बी.फार्म.), बी.एस्सी (कृषी) या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश दिला जाणार आहे. राज्यातील सर्वाधिक साडेचार लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले होते.
हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार