शंभर उपग्रहांच्या विक्रमात मालेगावचा आदित्य! स्पेस रिसर्च चॅलेंज उपक्रमांतर्गत ३५४ बालवैज्ञानिकांना संधी 

मालेगाव कॅम्प (जि.नाशिक) : बालवयातच अनेकांना विविध बाबींचे कुतूहल असते. अशा अनेक विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेताना संधी मिळाली आहे. भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आणि स्पेस इंडियातर्फे स्पेस रिसर्च चॅलेंज उपक्रमांतर्गत १०० उपग्रह बनविण्याच्या विश्वविक्रमात मालेगावच्या बालवैज्ञानिक आदित्य संजीव जायखेडकर याची निवड झाली. 

शंभर उपग्रहांच्या विक्रमात मालेगावचा आदित्य 
शंभर उपग्रह बनवून रामेश्वरम येथून अंतराळात सोडण्याचा अभिनव प्रयोग करून ७ फेब्रुवारी २०२१ ला एकाच दिवशी इंडिया रेकॉर्ड, आशियासह वर्ल्ड रेकॉर्ड, भारताचे उपराष्ट्रपती, तमिळनाडूचे राज्यपाल, अंतराळ संस्थेचे अध्यक्ष, शास्त्रज्ञ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रस्थापित होणार आहे.

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना

स्पेस रिसर्च चॅलेंज उपक्रमांतर्गत ३५४ बालवैज्ञानिकांना संधी 

जगातील कमी कमीत २५ ग्रॅम ते जास्तीत जास्त ८० ग्रॅमचे १०० उपग्रह बनवून आणि त्यांना ३५ ते ३८ हजार मीटर उंचीवर हेलियम बलूनच्या सहाय्याने पृथ्वीच्या समकक्षेत अवकाशात प्रस्थापित केले जाणार आहेत. या उपक्रमात महाराष्ट्राचे नेतृत्व समन्वयक मनीषा चौधरी, सचिव मिलिंद चौधरी करीत आहेत. प्राथमिक शिक्षक दांपत्य संजीव व नंदिनी जायखेडकर यांचा आदित्य मुलगा आहे. आदित्यच्या निवडीने केबीएचच्या लौकिकात भर पडली. आदित्यचा प्राचार्य अनिल पवार, उपप्राचार्य सुनील बागूल, पर्यवेक्षक विलास पगार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

उपग्रहांद्वारे संशोधन 
या उपग्रहनिर्मितीत महाराष्ट्रातून ३५४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांची उपग्रह बनविण्यासंदर्भातील ऑनलाइन प्रशिक्षण जानेवारीत पूर्ण झाले. सर्व शंभर उपक्रम उपग्रह एका केसमध्ये फिट केलेले असतील. केससोबत पॅराशूट, जी.पी.एस. ट्रॅकिंग सिस्टिम, लाइव्ह कॅमेरा जोडलेला असून, हे पृथ्वीच्या बाहेरील अवकाशातील प्रत्यक्ष ओझोन, कार्बन डायऑक्साइड, हवेची शुद्धता, हवेतील प्रदूषण हवेचा दाब आणि इतर माहिती पृथ्वीवरील केंद्राला पाठवतील. यासोबत काही झाडांचे बीजसुद्धा पाठविण्यात येणार आहे. यामुळे कृषी विभागात अवकाशातील शेती करण्याच्या संशोधनास मदत मिळणार आहे.