शंभर शेतकऱ्यांना बियाणे कंपनीचा ठेंगा; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

पिंपळगाव बसवंत (नाशिक) : नैसर्गिक प्रकोपामुळे गत वर्षी सोयाबीन पिकाची दाणादाण उडाली होती. यंदा निफाड तालुक्यात १८ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली होती. खरीप हंगामात पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याच्या निफाड तालुक्यात पावणेतीनशे तक्रारींचा पाऊस कृषी विभागाकडे पडला होता.

नगदी पीक म्हणून पेरणी केलेल्या सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या सुमारे २७५ तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या. पंचनामे केल्यानंतर २५६ ठिकाणी सदोष बियाणे आढळले. त्यामुळे संबंधित कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश होते. त्यानंतर १५६ शेतकऱ्यांना मदत मिळाली असन, १०० शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. 

संबंधित कंपन्यांवर कारवाईची मागणी

या प्रकारामुळे शेतकऱ्यांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. त्यातील २५६ तक्रारींमध्ये तथ्य आढळले. कंपन्यांनी काही शेतकऱ्यांना नव्याने बियाणे दिले, तर काहींना सोयाबीन बियाण्याची रक्कम परत केली. काही कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली. अशा २५६ पैकी १५६ शेतकऱ्यांना नुकसानीची रक्कम मिळाली. त्यात तीन लाख ७५ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळाले. मात्र उर्वरित शंभर शेतकऱ्यांना बियाणे कंपनीने ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे संबंधित कंपन्यांवर कारवाईची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार

शेतकऱ्यांची ग्राहक मंचात धाव 

कृषी विभागाने पंचनामे केल्यानंतर अनेक कंपन्यांचे बियाणे सदोष आढळल्यामुळे कृषी विभागाने त्या कंपन्यांवर सदोष बियाणे संदर्भात केसेस दाखल केल्या आहेत. त्या ठकबाज कंपन्यांची मुजोरी मात्र गेलेली नाही. शेतकऱ्यांची फसवणूक करून भरपाईही न देण्यास त्यांनी नकार दिला आहे. भरपाईपासून वंचित शेतकऱ्यांनी ग्राहक मंचात धाव घेतली आहे. पालखेड उपबाजारात सोयाबीनला चार हजार २०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळतो आहे, असा आकर्षक दर असताना अगोदर पेरलेले बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी सोयाबीनचा नाद सोडला. कंपनीच्या ठकबाजीमुळे शेतकऱ्यांना आकर्षक दरापासून वंचित राहावे लागत आहे. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसला. या काळात कंपन्यांनी मदत करायला हवी होती, तसेही झाले नाही. 

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

पंचनाम्यापैकी १५६ शेतकऱ्यांना तीन लाख ७५ हजार रुपयांची मदत मिळाली. उर्वरित शेतकऱ्यांनी कंपनीविरोधात ग्राहक मंचात धाव घेतली आहे. 
-बी. जी. पाटील (तालुका कृषिअधिकारी, निफाड)