नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने अंशतः लॉकडाउन लागू केला आहे. याअंतर्गत येणाऱ्या निर्बंधांची अंमलबजावणी मंगळवारी (ता. ९) मध्यरात्री बारापासून पुढील आदेशापर्यंत केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या सूचनेनुसार सोमवार ते शुक्रवारदरम्यान जिल्हाभरातील दुकाने, बाजारपेठा, तसेच धार्मिक स्थळे सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत सुरू राहतील, तर शनिवार व रविवारी दुकाने, बाजारपेठा धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद राहणार आहेत.
हॉटेल, बारबाबत सुचना; मद्यविक्री दुकान मात्र बंद
हॉटेल व बारला आठवडाभरासाठी वेळेचे बंधन आणि उपस्थितीचेसुद्धा ५० टक्क्यांचे बंधन आधीच घातले आहे. त्यामुळे वेगळ्याने शनिवारी व रविवारी पूर्ण दिवस बंद ठेवण्याची आवश्यकता तूर्त वाटत नाही. हॉटेल व बारमध्ये जाण्याच्या वेळा सर्वसाधारण संध्याकाळच्या असतात आणि त्यावर ५० टक्क्यांची मर्यादा पूर्ण आठवड्यासाठी कायम केलेली आहे. या ठिकाणांवरही सायंकाळी खूप गर्दी होत असल्याची बाब निदर्शनास आल्यास याबाबत यथोचित निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले. यामुळे हॉटेल व बार वीकेंडला खुले राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मद्यविक्री दुकाने अन्य दुकानांप्रमाणे सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत सुरू राहतील. शनिवार व रविवारी मद्यविक्री दुकाने बंद राहणार असल्याचेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी कळविले आहे.
नाशिक जिल्हा व शहरातील विविध निर्बंधांसंदर्भातील आदेश काल रात्रीच पाठविले आहेत. शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी सर्व दुकाने (जीवनावश्यक सोडून) व धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद राहतील, अशी स्पष्ट तरतूद आदेशामध्ये आहे. या दिवसांत सुटीचा फायदा घेऊन होणारी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने हे निर्देश दिलेले आहेत. -सूरज मांढरे, जिल्हाधिकारी
शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस पुढील आदेशापर्यंत बंद
जिल्हा प्रशासनाने सोमवारी (ता. ८) बैठक घेत यानंतर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अंशतः लॉकडाउनची घोषणा केली होती. या निर्बंधांची अंमलबजावणी मंगळवारी (ता. ९) रात्री बारापासून होणार आहे. नाशिक व मालेगाव महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद राहतील. तथापि, दहावी, बारावीबाबत पालकांच्या संमतीने उपस्थिती ऐच्छिक राहील. या संस्थांद्वारे ऑनलाइन स्वरूपात कामकाज सुरू ठेवता येईल, तसेच यापूर्वी घोषित परीक्षा कोविड-१९ विषयक सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करत घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू व सेवा देणाऱ्या व्यावसायिकांसाठी हे निर्बंध लागू राहणार नाहीत.
हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड
सायंकाळनंतर शुकशुकाट
निर्बंध मध्यरात्रीपासून लागू होणार असले तरी मंगळवारी (ता. ९) सायंकाळी सातनंतर बहुतांश व्यावसायिकांनी दुकाने बंद केल्याने बाजारपेठांमध्ये शुकशुकाट बघायला मिळाला. काही शाळा, महाविद्यालये, शिकवण्या बंद ठेवलेल्या होत्या. जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात या कालावधीत सुरू राहतील, तसेच प्रत्येक शनिवार व रविवारी सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहतील. हे निर्बंध अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळे, किराणा, दूध व वृत्तपत्रे वितरणाच्या बाबत लागू राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO
असे असतील निर्बंध...
जिल्ह्यातील सर्व आठवडेबाजार राहणार बंद
-१५ मार्चपासून लॉन्स, मंगल कार्यालय, हॉलमधील.
-लग्नसमारंभ व अन्य कार्यक्रम पूर्णपणे बंद राहतील.
-खाद्यगृहे, परमिट रूम, बार ५० टक्के क्षमतेने.
-सकाळी सात ते रात्री नऊदरम्यान सुरू राहतील.
-होम डिलिव्हरीचे किचन, वितरण कक्ष रात्री दहापर्यंत सुरू राहील.
-सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम पूर्णपणे बंद राहतील.
-भाजी मंडई ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार.