शहरातील १२० बड्या थकबाकीदारांना नोटिसा! मालमत्ता जप्तीची कारवाई 

नाशिक : मार्चएंडमुळे महसूल वसुलीसाठी सरसावलेल्या महापालिका प्रशासनाने शहरातील १२० बड्या थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजावल्या असून, पुढील आठवड्यात कारवाईची व्याप्ती वाढविली जाणार आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत अद्यापही ३३ कोटी रुपये महसूल कमी असल्याने कारवाई सुरू करण्यात आली आहे. 

वसुलीसाठी अभय योजना सुरू
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरवात झाली. एप्रिल महिन्यात नाशिक शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. या दरम्यान लॉकडाउन जाहीर करण्यात आला. चार महिन्यांचा लॉकडाउन व पुढे अंशतः लॉकडाउनमुळे महापालिकेच्या घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीवर त्याचा परिणाम झाला. प्रशासनाने वसुलीसाठी अभय योजना सुरू केली. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. मार्च महिन्यात बहुतांश व्यक्तींचा कर भरण्याकडे कल असतो. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे पंधरा दिवस शिल्लक राहिल्याने महापालिकेने घरपट्टी वसुलीचा आढावा घेतला. थकबाकीसह १६० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यात १२८ कोटी रुपये चालू वर्षाचे उद्दिष्ट, तर ३२ कोटी रुपये थकबाकी होती. आतापर्यंत थकबाकीसह १०५ कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे.

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

आर्थिक तूट कायम राहणार असल्याचा अंदाज

गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत १३८ कोटी रुपये महसूल घरपट्टीतून मिळाला होता. मागच्या व या वर्षाच्या घरपट्टी महसुलात अद्यापही ३३ कोटी रुपयांचा फरक आहे. आर्थिक वर्ष संपण्यास पंधरा दिवस शिल्लक आहेत. या अखेरच्या दिवसांत फारतर दहा कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होऊ शकतो. त्या मुळे आर्थिक तूट कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

 हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर 

मालमत्ता जप्तीची कारवाई 
महसूल प्राप्तीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध कर विभागाने थकबाकीदारांना नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत १२० थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, अंतिम नोटीसद्वारे थकबाकी अदा न केल्यास मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार असल्याची माहिती कर विभागाचे उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी दिली.