शहरात कोव्हिशील्डचा तुटवडा! दीड लाख डोसची नोंदविली मागणी 

नाशिक : महिनाभरापासून सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणात वापरली जाणारी कोव्हिशील्ड लस शुक्रवारी (ता. १२) शहरात संपल्याने अनेकांना आरोग्य केंद्रांवरून परत जावे लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेने तातडीने दीड लाख कोव्हिशील्ड लसींची मागणी पुणे येथील उपसंचालक कार्यालयाकडे नोंदविली आहे. आतापर्यंत ५० हजार ७०० लसी वापरण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. 

शहरात कोव्हिशील्डचा तुटवडा 
जानेवारी महिन्यात कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने खालावल्यानंतर कोरोना शहरातून गायब झाल्याची स्थिती होती. याचदरम्यान कोरोना प्रतिबंधक कोव्हिशील्ड लस उपलब्ध झाल्याने कोरोनाविषयक भीती दूर होण्यास मदत झाली. कोव्हिशील्ड लसीकरण सर्वांना देण्याचे नियोजन असले तरी प्रथम आरोग्यसेवक, डॉक्टर, फ्रंटलाइनवर काम करणारे कर्मचारी, शासकीय कर्मचारी यांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरण करताना शासनाच्या ॲपमध्ये माहिती भरणे बंधनकारक करण्यात आले. शासकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाल्यानंतर ४५ ते ५९ वयोगटातील गंभीर आजाराचे रुग्ण, तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याची मोहीम सुरू आहे.

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO 

दीड लाख डोसची नोंदविली मागणी 

महापालिकेचे रुग्णालय, तसेच आरोग्य केंद्राबरोबरच खासगी रुग्णालयांतूनदेखील लस दिली जात आहे. महापालिकेला ५० हजार ७०० कोव्हिशील्डचे डोस प्राप्त झाले होते. आज संपूर्ण लस संपुष्टात आल्याने अनेकांना लसीकरण न करताच परतावे लागले. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने पुणे येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे दीड लाख लसींची मागणी नोंदविली आहे. शनिवारी सकाळपर्यंत लस पोचेल, असा दावा केला आहे. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

मतदारांना आकर्षित करण्याचा फंडा 
महापालिकेतर्फे आरोग्य केंद्रांवर कोव्हिशील्ड लस उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर नगरसेवकांसाठी मतदारांना आकर्षित करण्याची जणू पर्वणी उपलब्ध झाली. प्रभागांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना बोलावून लसीकरण केले जात आहे. त्यातून तुटवडा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. 

महापालिकेला प्राप्त झालेले कोव्हिशील्ड डोस संपुष्टात आल्यानंतर तातडीने मागणी नोंदविण्यात आली आहे. शनिवारी सकाळपर्यंत लस पोचेल. 
-डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका