शहरात दिवाळी खरेदीचा फीव्हर कायम! जिल्ह्यातील शाळा बंद, दुसरीकडे मात्र बेसुमार गर्दी

नाशिक : दिवाळी संपली असून, तीन दिवसांपासून शहर-जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्याही वाढत असल्याने रविवारी (ता.२२) जिल्ह्यातील शाळा ४ जानेवारीपर्यंत न उघडण्याचा निर्णय झाला आहे. कोरोना प्रतिबंधासाठी एका बाजूला विविध प्रयत्न सुरू असताना, शहरात दिवाळी फीव्हर मात्र कायम आहे. आज रविवारच्या सुटीत मेन रोडसह विविध बाजारापेठांत खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. सोशल डिस्टन्सिंग दूरच; पण अनेकांनी मास्कही लावलेले नव्हते. 

दिवाळी फीव्हर कमी होईना

एका बाजूला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चर्चा सुरू असताना गर्दीला आवरणार कसे? हा प्रश्‍न कायम आहे. रविवारी राज्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता सरकारतर्फे वर्तविण्यात आली आहे. त्याची चाहूल शहरात दिसू लागली आहे. तीन दिवसांपासून सलग कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. प्रशासनांकडून विविध प्रकारची काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. मात्र त्याचे गांभीर्य जाणवत नाही. प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत दिवाळीनिमित्त विविध प्रकारच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली. वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून गर्दी करणे साहजिक होते. पण दिवाळी संपून आठवडा उरकत आला तरी, दिवाळी फीव्हर कमी होत नाही. 

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

 मास्क नाहीच केवळ खरेदीसाठी उत्साह

बाजारात खरेदीसाठी होणारी गर्दी ती होतच आहे. रविवारी (ता.२२) मेन रोड, शालिमार, दहीपूल, भद्रकाली परिसरात नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. कुठल्या प्रकारचा सोशल डिस्टन्सिंग नाही. ना मास्क केवळ खरेदीसाठी उत्साह दिसून येत होता. शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांनी स्वतःहून काळजी घेणे आवश्‍यक आहे. थंडीचे आणखी काही दिवस तरी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे. असे जर झाले नाही, तर रुग्णसंख्या वाढत राहील. त्यास आळा घालण्यासाठी पुन्हा एकदा प्रशासनास कडक नियमावली करावी लागेल. लॉकडाउन, जनता कर्फ्यू यासारख्या मार्गाचा अवलंब करावा लागेल, अशी वेळ येऊ नये, यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, गर्दी करणे टाळावे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. अशा प्रकारचे आवाहनही वारंवार प्रशासनाकडून केले जात आहे. 

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?