शहरात लॉकडाउन, मिनी लॉकडाउन की कठोर निर्बंध? ठिकठिकाणी बॅरिकेडींगमुळे चर्चेला उधाण

नाशिक : कोरोनाच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावामुळे जिल्‍हा प्रशासनाने जाहीर केलेल्‍या निर्बंधांनुसार शनिवारी (ता.३) शहर परिसरात बहुतांश दुकाने बंद होती. जीवनावश्‍यक व वैद्यकीय व्‍यवसाय वगळता अन्‍य व्‍यावसायिकांनी निर्बंधांचे पालन केले. दुसरीकडे शहरातील रस्‍त्‍यांवर मात्र सामान्य दिवसाप्रमाणेच वर्दळ बघायला मिळाली. बंदच्‍या पार्श्वभूमीवर रस्‍ते मोकळे असल्‍याने प्रशासकीय यंत्रणेने शहर व परिसरात ठिकठिकाणी बॅरिकेडींगचे काम हाती घेतले होते. दरम्‍यान, हा लॉकडाउन किंवा मिनी लॉकडाउनची तयारी आहे की निर्बंध अधिक कठोर केले जाणार, याबाबत चर्चेला उधाण आले होते. 

कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी शनिवार व रविवारी जीवनावश्‍यक वस्‍तू वगळता अन्‍य दुकाने बंद ठेवण्याच्‍या निर्बंधांचा यंदाचा चौथा आठवडा आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्‍या शिवाजी रोड, मेन रोड, महात्‍मा गांधी मार्गासह उपनगरीय भागांमध्येही व्‍यावसायिकांनी नियमांचे पालन करत दुकाने बंद ठेवली. प्रशासनाच्‍या सूचनेप्रमाणे मर्यादित वेळेसाठी किराणा, भाजीपाला व औषध विक्रेत्‍यांची दुकाने सुरू होती. 

एरवी वर्दळ असलेल्‍या मेन रोड परिसरातील काही भागांमध्ये शनिवारी (ता.३) निर्बंधांमुळे शुकशुकाट होता. यातून प्रशासकीय यंत्रणेने गर्दीला अटकाव करण्यासाठी बॅरिकेडींगचे काम हाती घेतले होते. वंदे मातरम् चौक, मुंदडा मार्केट, सांगली बँक चौक (रेडक्रॉस चौक) यांसह बाजारपेठेत प्रवेशासाठी महत्त्वाच्‍या ठिकाणांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहे. दुसरीकडे सर्वत्र लॉकडाउनची चर्चा असल्‍याने, त्‍यासाठीच तर ही तयारी नाही ना, अशा आशयाची चर्चा जोर धरत होती. लॉकडाउन किंवा मिनी लॉकडाउन लागेल की निर्बंध अधिक कठोर होतील, याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. शनिवार (ता.३) प्रमाणे उद्या (ता. ४)देखील बंद पाळला जाणार आहे. 

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी

बँकांमध्ये वाढली गर्दी 

मार्चएंडनंतर गुरुवारी (ता.१) व शुक्रवारी (ता.२) गुड फ्रायडेनिमित्त असे सलग दोन दिवस बँकांना सुट्या आल्‍या होत्‍या. त्‍यातच उद्या (ता.४) रविवारनिमित्त पुन्‍हा सुटी येत असल्‍याने शनिवारी नागरिकांनी बँकांमध्ये गर्दी केली होती. शारीरिक अंतराचे पालन करण्याच्‍या अनुषंगाने सुरक्षारक्षकांकडून उपाययोजना करण्यात आल्‍या. दरम्‍यान, यामुळे बँकांच्‍या बाहेरील परिसरापर्यंत ग्राहकांची रांग लागली होती. 

लॉकडाउनच्‍या धास्‍तीने 

मजुरांची रेल्‍वेस्‍थानकावर गर्दी 
कोरोनाच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन लागणार असल्‍याची चर्चा विविध पातळ्यांवर केली जात आहे. याची धास्‍ती घेताना परराज्‍यातील मजुरांनी नाशिक रोड रेल्‍वेस्‍थानकाकडे आपली पावले वळवली. यामुळे रेल्‍वेस्‍थानकाच्‍या आवारात गर्दी झाल्‍याचे चित्र होते. 

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता