शहर बससेवेचा मुहूर्त टळला! परिवहन खाते असलेल्या शिवसेनेकडून भाजपची अडवणूक 

नाशिक : राज्य शासनाच्या परिवहन विभागाकडून परिवहन परवाना प्राप्त न झाल्याने शहर बससेवेसाठी निश्‍चित केलेला प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त पुढे ढकलण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली. राज्यात शिवसेनेकडे असलेल्या या खात्याकडून परवाना न मिळाल्याने विकासाला ‘खो’ घातला जात असल्याचा भाजपच्या आरोपांवर यानिमित्त शिक्कामोर्तब झाले आहे. 

प्रजासत्ताक दिनाचा होता मुहूर्त 

राज्य परिवहन महामंडळातर्फे शहरात सुरू असलेली बससेवा महापालिकेने चालविण्याचा निर्णय घेतला. २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला बससेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने सेवा सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. पहिल्या टप्प्यात ६०० बस चालविण्याचे नियोजन होते. मात्र, तोटा अधिक वाढत असल्याने ‘ग्रॉस कॉस्ट कटिंग’ या तत्त्वानुसार ४०० बस सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद व महापालिकेला होणारा तोटा लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात २५० बस सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. बससेवेसाठी महापालिकेचे इन्फ्रास्ट्रक्चर राहणार असून, बस पुरविण्यासाठी ठेकेदार कंपन्यांची नियुक्ती, ऑपरेटर, चालक व वाहकांची नियुक्ती महापालिका करणार आहे. तिकीट वसुली ठेकेदारमार्फत होणार असून, किलोमीटरमागे बस ऑपरेटर कंपन्यांना ठरविक रक्कम अदा केली जाणार आहे. १०० सीएनजी, १०० डिझेल, तर ५० इलेक्ट्रॉनिक बस चालविण्याचे नियोजन केले होते. बससेवा सुरू करण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त निश्‍चित केला होता. आयुक्त कैलास जाधव यांनी तशी घोषणाही केली होती. त्यामुळे सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज झाले होते. मात्र, राज्य शासनाच्या परिवहन विभागाकडून परिवहन परवाना आवश्‍यक असतो. अद्यापपर्यंत तो प्राप्त न झाल्याने सेवा पुढे ढकलण्यात आली आहे. 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच

भाजपच्या हाती कोलीत 

शहरात दोन उड्डाणपूल व विकासकामे मार्गी लावण्यासाठी ३०० कोटी रुपयांचे कर्ज काढण्यावरून वाद सुरू आहे. भाजपने शिवसेनेकडून विकासकामांमध्ये अडथळा निर्माण केला जात असल्याचा आरोप केला आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेच्या वाट्याला परिवहन खाते आले आहे. परिवहन परवाना या विभागातर्फे दिला जातो. तीनदा स्मरणपत्रे देऊनही परवाना मिळत नसल्याने शिवसेनेकडून विकासात अडथळा आणला जात असल्याच्या भाजपच्या आरोपाला पुष्टी मिळत असल्याचे बोलले जात असून, भाजपच्या हाती शिवसेनेने आयते कोलीत दिल्याने येत्या काळात बससेवेवरून भाजप शिवसेनेला घेरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

परिवहन विभागाचे स्मरणपत्रांकडे दुर्लक्ष 

राज्यात महाविकास आघाडीत शिवसेनेकडे परिवहन खाते आहे. बससेवा सुरू करण्यासाठी परिवहन विभागाकडून परिवहन परमीट आवश्यक असते. त्यासाठी महापालिकेने राज्याच्या परिवहन विभागाला फेब्रुवारी २०२० मध्ये पत्र पाठवून परिवहन परमीटची मागणी केली. महापालिकेने यासंदर्भात परिवहन सचिवांना तीन वेळा स्मरणपत्रे पाठविली. आयुक्त कैलास जाधव यांनी स्वत: परिवहन सचिवांशी चर्चा केली. तरीही त्याकडेही दुर्लक्ष झाल्याने बससेवा अनिश्चित काळासाठी आता पुढे ढकलली गेली आहे.