शहर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – अब्दुल सत्तार

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील नागरी सुविधा व रस्त्यांमुळे विकास कामांना गती मिळते. जुना आग्रा रस्त्याच्या नूतणीकरणातून विकासाबरोबरच शहराच्या वैभवात भर पडेल. शहरातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज (ता. १५) दिली. शहरातील जुना आग्रा रस्त्याच्या तीन विविध टप्प्यातील सुमारे १३ कोटींच्या नूतणीकरणाच्या कामाचे भूमिपूजन सत्तार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते

सत्तार म्हणाले, की शहरातील विकासकामे दर्जेदार होण्यासाठी लोकप्रतिनीधींसह नागरिकांनी जागरूक राहिले पाहिजे. अल्पसंख्याक समाजाच्या विकास कामांसाठी शासन सदैव प्रयत्नशील आहे. शासनामार्फत रस्ते विकासाबरोबरच इतरही प्रश्न मार्गी लावण्यात येतील. शहरवासीयांनी कोरोनाच्या संकटाला ज्या पद्धतीने परतावून लावले, त्याच पद्धतीने आगामी काळात नागरिकांनी आरोग्य प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. नागरिकांना समुपदेशन करून लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

माजी आमदार रशीद शेख म्हणाले, की शहर विकासासाठी कटिबद्ध आहे. जुना आग्रा रस्त्यावरील अतिक्रमणधारकांनी स्वत:हून पुढाकार घेत अतिक्रमण काढून घ्यावे. या रस्त्याचे दुभाजकासह कॉंक्रिटीकरणाबरोबरच आरसीसी नाला करण्यात येईल. यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर जमा होणाऱ्या पाण्याचा निचरा सहजपणे होईल. रस्ते विकासाबरोबरच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच ३० खाटांचे सुसज्ज रुग्णालय कार्यान्वित होणार आहे.

 हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर 

माजी आमदार रशीद शेख, महापौर ताहेरा शेख, उपमहापौर नीलेश आहेर, स्थायी समितीचे सभापती राजाराम जाधव, माजी आमदार आसिफ शेख, नगरसेवक मदन गायकवाड, उपायुक्त नितीन कापडणीस, तहसीलदार चंद्रजित राजपूत आदी उपस्थित होते.  सत्तार व प्रमुख मान्यवरांचा यावेळी महापौर शेख व उपमहापौर नीलेश आहेर यांच्या हस्ते सत्कार झाला. कार्यक्रमास नगरसेवक, महापालिका अधिकारी, विभागप्रमुख व नागरिक उपस्थित होते.