नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीत श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दनस्वामी यांचे नाव व फोटो वापरण्यावरून वाद सुरू झाला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या स्वामी शांतिगिरी महाराज यांनी जनार्दनस्वामींचा फोटो व नाव न वापरता निवडणूक लढवावी, अशा आशयाचे पत्रक श्री शर्वायेश्वर महादेव ट्रस्टच्या विश्वस्तांनी जारी केले आहे.
स्वामी शांतिगिरी यांनी नाशिक मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याचा मनोदय जाहीर केला आहे. सुरुवातीला महायुती आणि त्यानंतर महाविकास आघाडीकडून ते निवडणूक लढवतील असे सांगितले जात होते. परंतु, दोन्ही युती आघाडीकडून उमेदवारी मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केल्याचे समजते. त्यासाठी जय बाबाजी भक्त परिवारातर्फे जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात विविध ठिकाणी शांतिगिरी महाराज यांचे होर्डिंग्जही उभारण्यात आले होते. दरम्यान,शांतिगिरी महाराज यांच्या पत्रकावर जनार्दनस्वामी यांच्या फोटोचा वापर करण्यात आला असल्याने जनार्दनस्वामींची प्रतिमा मलीन होत असल्याचा दावा ट्रस्टच्या विश्वस्तांनी केला आहे. स्वामी शांतिगिरी महाराज राजकारणाचे शुध्दीकरण करायचे आहे, असे सांगत प्रचार करीत आहेत. त्यांना राजकारणाचे खरोखर शुध्दीकरण करायचे असल्यास त्यांनी राजकीय पक्षांच्या आश्रयाला न जाता निवडणूक लढवून, जिंकून दाखवावी. मग राजकारणाचे शुध्दीकरण करा, त्यानंतर आमचाही तुमच्यावर विश्वास बसेल, अशी भूमिका ट्रस्टच्या विश्वस्तांनी पत्रकाद्वारे मांडली आहे. या पत्रकावर ट्रस्टचे विश्वस्त दिलीप चिंतामण जोशी, अनंता सुरेश पाचोरकर, अनिल काळे यांची नावे आहेत.
काही व्यक्तींकडून केले जात असलेले सर्व आरोप निराधार आहेत. तरीही कुणाला काही तक्रार करायची असल्यास करावी. लोकशाही असल्याने सर्वांना अधिकार असला तरी सर्वसामान्य नागरिकांना सर्व काही कळत असते. त्यामुळे याबाबत अधिक काहीही स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता नाही. – शांतीगिरी महाराज
हेही वाचा :
- Thalapathy vijay : ‘थलपति’ला पाहण्यासाठी केरळच्या फॅन्सची तुफान गर्दी; गाडीचे नुकसान (video)
- झारखंड मुक्ती मोर्चाला माेठा धक्का, Sita Soren यांनी दिला पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा
- Elvish Yadav : एल्विश यादवला क्वारंटाईन सेलमधून उच्च-सुरक्षा बॅरेकमध्ये हलवले
The post शांतिगिरी महाराजांच्या अडचणीत वाढ; जनार्दनस्वामींचे नाव, फोटो वापरण्यास विरोध appeared first on पुढारी.