शाळाबाह्य मुलां;च्या सर्वेक्षणाला अगोदर स्थगितीच; मग स्थगिती रद्दचे आदेश जारी 

नाशिक : शिक्षण उपसंचालकपदाची सूत्रे नितीन उपासनी यांनी स्वीकारल्यानंतर शिक्षण उपसंचालक कार्यालयातील गंमतीजमती बंद होतील, अशी सर्वसाधारण अपेक्षा शिक्षण क्षेत्राला होती. मात्र, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील यंत्रणा सुधारण्याचे नाव घेताना दिसत नाही. कार्यालयातील कामाच्या गर्दीत शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण १५ जूनपर्यंत स्थगित करण्याच्या पत्रावर उपासनी यांची स्वाक्षरी घेण्यात आली. हे पत्र सोशल मीडियातून व्हायरल झाल्याची बाब निदर्शनास येताच उपासनी यांनी सर्वेक्षण स्थगितीचे आदेश रद्दचे सुधारित आदेश जारी केले आहेत. त्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना सर्वेक्षण सुरू ठेवावे लागणार आहे. 

शिक्षण संचालकांची मुदतीत सर्वेक्षणाची सूचना 
शिक्षण संचालकांनी कोरोना विषाणू फैलावाच्या अनुषंगाने शाळा बंद असल्या तरीही मुदतीत सर्वेक्षण पूर्ण करावे, अशी सूचना शिक्षण संचालकांनी केली आहे. त्यासंबंधीचे पत्र शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी मेलवरून शिक्षणाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहे. ही स्थिती एकीकडे असली, तरीही सोशल मीडियातून सर्वेक्षण स्थगित करण्याचे आदेश कसे जारी झाले, याबाबत श्री. उपासनी यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी शिक्षण आयुक्तांचे आदेश घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे माध्यमिक मुख्याध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते, अशी माहिती दिली. तसेच कामाच्या गर्दीत सर्वेक्षण स्थगित पत्रावर स्वाक्षरी घेणाऱ्या संबंधितांना कारणे दाखवा नोटीस दिली जाणार असल्याचे स्पष्ट करून शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार १० मार्चपर्यंत शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण सुरू राहील आणि तसे पत्र पाठविले असल्याचेही त्यांनी सांगितले. 

१० मार्चपर्यंत सर्वेक्षण पूर्ण केले जाणार
दरम्यान, शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या पत्राच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांच्याशी संपर्क साधल्यावर शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या माध्यमातून १० मार्चपर्यंत सर्वेक्षण पूर्ण केले जाणार असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयाच्या ‘त्या’ पत्राची माहिती नसल्याचे सांगून त्यांनी सर्वेक्षण स्थगितीचे आदेश जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने दिला नाही, असे म्हणत त्यांनी सर्वेक्षण सुरू राहील, असे सांगितले. 
 

कोरोना विषाणू फैलाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने १५ मार्चपर्यंत शहर आणि जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. तसेच शिक्षकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे की नाही, याची खात्री अधिकारी करून घेण्यास तयार नाहीत. अशाही परिस्थितीत शिक्षकांनी सर्वेक्षण करावे, असा आग्रह धरला जात आहे. हे उचित नाही. 
-एस. बी. शिरसाट, अध्यक्ष, माध्यमिक मुख्याध्यापक संघटना