शाळा सुरू होण्याआधी शिक्षकांच्या कोविड चाचण्या करुन घ्या; आमदार कोकाटे यांच्या सूचना

सिन्नर (नाशिक) : 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली असून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पालकांचे संमतीपत्र भरून घेऊन नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन आहे. त्या पार्श्वभूमीवर संबंधित शिक्षकांच्या कोविड चाचण्या करून घेण्यात याव्यात अशी सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी केली आहे.

आमदार कोकाटेंच्या प्रशासनाला सूचना

सिन्नर तालुक्यात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी शिक्षण विभागाच्या सहकार्याने आरोग्य केंद्र स्तरावर शिक्षकांचे स्वॅब संकलन करावेत असे निर्देश आमदार कोकाटे यांनी दिले आहेत. मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यापासून शाळा बंदच आहेत. राज्य सरकारने टप्प्या टप्प्याने शाळा सुरू करण्याची घोषणा केली. येत्या 23 डिसेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरवण्याचे नियोजन आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेने देखील येत्या काळात भारतात कोरोना संसर्ग वाढणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यापूर्वी संबंधित शाळांचे शिक्षक व इतर सेवकांच्या कोरोना चाचण्या करून घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन कोकाटे यांनी तालुक्यातील सर्व शिक्षकांच्या प्राधान्याने चाचण्या करून घेण्याची सूचना केली आहे.

शिक्षकांना त्यांच्या सोयीने स्वॅब नमुना संकलित करण्यासाठी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व्यवस्था करावी असे कोकाटे यांनी म्हटले आहे. कोकाटे यांच्या निर्देशाप्रमाणे सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी (ता. 18) 40 शिक्षकांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले आहेत. रतन इंडिया येथील कोविड रुग्णालय येथे देखील गुरुवारी (ता. 19) पासून नियोजन करण्यात आले आहे. शिक्षण विभागाकडून शिक्षकांची माहिती प्राप्त झाली असून शाळानिहाय शिक्षकांना तेथे बोलवण्यात येईल. - डॉ. मोहन बच्छाव, तालुका आरोग्य अधिकारी