शासकीय, निमशासकीय कार्यालय इमारतींचे फायर ऑडिट होणार; उदय सामंत यांची घोषणा 

नाशिक : महापालिका मुख्यालयाला आग लागण्याची घटना दुर्दैवी असून, या निमित्ताने महापालिकांसह शासकीय इमारतींच्या फायर ऑडिटचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यापार्श्‍वभूमीवर राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी यासंदर्भात चर्चा करून राज्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या इमारतींचे फायर ऑडिट करण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घटनेनंतर केली. 

महापालिका मुख्यालयालातील विरोधी पक्षनेत्यांच्या दालनाला आग लागल्याची घटना घडल्यानंतर  सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेना गटनेते विलास शिंदे, आयुक्त कैलास जाधव, आमदार सुहास कांदे आदी उपस्थित होते. पाहणीनंतर सामंत म्हणाले, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, घटनेच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आल्याचे आयुक्तांनी माहिती दिली. चौकशीअंती आगीचे कारण समोर येईल. भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेली आग व महापालिका मुख्यालयाला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर शासकीय, निमशासकीय, तसेच खासगी इमारतींचे फायर ऑडिट करणे गरजेचे झाले आहे. राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून इमारतींच्या फायर ऑडिट संदर्भात निर्णय घेऊन तशा सूचना दिल्या जाणार असल्याचे सामंत म्हणाले. 

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना