शासकीय मका खरेदीचे पोर्टल बंद; लॉट एंट्रीअभावी शेकडो शेतकरी वंचित 

रेडगाव खुर्द (जि.नाशिक) : राज्यात शासकीय मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने अचानक खरेदी केंद्रावरील पोर्टल बंद करण्यात आले. मात्र लॉट एंट्रीअभावी शेकडो शेतकरी वंचित राहिले आहेत. जिल्ह्यातील अनेक खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची मका खरेदी झाली, मात्र लॉट एंट्री बाकी राहिली, अशा शेतकऱ्यांच्या मक्याचे करायचे काय, असा प्रश्न खरेदी केंद्रांना पडला आहे.

शासकीय मका खरेदीचे पोर्टल बंद 

शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत जर खरेदीची मुदत दिली होती, तर मुदतीपूर्वीच पोर्टल का बंद केले. निदान लॉट एंट्री तरी चालू ठेवायला पाहिजे होती. तसेच शासनाने मका खरेदीसाठी २ नोव्हेंबरपासून परवानगी दिली होती. मात्र जिल्ह्यातील बहुतांशी केंद्रांना ११ डिसेंबरला बारदान दिल्यानंतर सहा दिवसांतच खरेदी बंद केली. सरकारच्या या सुलतानी निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. निदान खरेदी झालेला मका तरी शासनाने स्वीकारावा. तसेच शासनाला उद्दिष्टपूर्ती होईपर्यंतच मका खरेदी करायची आहे तर तारखेची मुदत देतातच कशासाठी, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...

लॉट एंट्रीअभावी शेकडो शेतकरी वंचित 

खासदार डॉ. भारती पवार यांना याबाबत उद्दिष्टपूर्तीमुळे पोर्टल बंद झाले. मात्र मुदतवाढीसाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा करू, राज्य सरकारनेही केंद्राकडे वाढीव मागणी करावी, असे सांगून राज्य सरकारने खरेदीचे उद्दिष्ट कमी का दाखविले, असा प्रश्न उपस्थित केला. जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाने वाढीव मागणी केली आहे. मात्र मागणी मान्य न झाल्यास खरेदी केंद्रावरील खरेदी झालेला मका शेतकऱ्यांना परत करावा लागेल, असे सांगितल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे.  

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा