“शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ही नाशिकच्या वाढदिवसाची भेट” 

नाशिक :  नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधीनस्त १०० विद्यार्थी प्रवेशक्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे. ही मान्यता म्हणजे नाशिकच्या १५१ व्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्याला मिळालेली भेट आहे. येत्या शैक्षणिक वर्षात या महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. 

जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयात बैठकीत बोलत होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव कालिदास चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे समन्वयक अधिकारी डॉ. संदीप गुंडरे, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते. 

केंद्राकडे प्रस्ताव 

भुजबळ म्हणाले, की महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ६२७ कोटी ६२ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमाच्या तरतुदीनुसार अभ्यासक्रमांचे व इतर शुल्क निश्चित करून आकारणी करण्यासदेखील मान्यता देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात वैद्यकीय पर्यटनाच्या संधी निर्माण होऊन नाशिक एक वैद्यकीय हब म्हणून विकसित करण्याचे प्रयत्न आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रस्तावित १५ विषयांत ६४ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या नवीन जागा निर्माण करण्यासदेखील मान्यता आहे. हे वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या अधीनस्त पूर्णत: स्वायत्त संस्था असणार आहे. हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा. त्यासाठी मंत्रालयस्तरावर प्रयत्न केले जातील. 

हेही वाचा - लग्नाच्या दोनच दिवसांत नवरी पसार! पुण्यातील नवरदेवाची लाखोंची फसवणूक

विद्यापीठाला तत्काळ भूखंड 

जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, की जिल्हा प्रशासनातर्फे आरोग्य विज्ञान विद्यापीठाला तत्काळ भूखंड उपलब्ध करण्यात येईल. विद्यापीठ प्रशासनानेही पारंपरिक नियमावलीच्या मानदंडात न अडकता हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी अपवादात्मक बाब म्हणून सर्वच पर्याय खुले आहेत. मिशन मोडवर विद्यापीठाने हे महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षात सुरू करण्याचे नियोजन करावे, कुलसचिव चव्हाण यांनी विद्यापीठाकडे स्थापनेपासून तर सद्यःस्थितीत विविध पातळ्यांवर असलेली क्षमता, भविष्यातील गरज व महाविद्यालय सुरू करण्यासाठी करत असलेल्या कामकाजाची माहिती या वेळी दिली. 

प्रस्तावित जागेची पाहणी 

बैठकीनंतर रुग्णालयासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांप्रमाणे आवश्यक जागा देण्यास मान्यता देण्यात आली, त्यानुसार शुक्रवारी बैठक संपल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी विद्यापीठाच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह विद्यापीठाच्या आवाराला लागून असलेल्या प्रस्तावित जागेस प्रत्यक्ष भेट दिली.  

हेही वाचा - ऑनलाइन गेम ठरतायत विद्यार्थ्यांच्या भविष्याला घातक! मानसिक गुंता सोडविण्यासाठी तज्ज्ञांकडे गर्दी