शासनाचे आदेश : ‘पुरवठ्या’चे अधिकारी पोहोचले रेशन दुकानात

E Poss www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेअंतर्गत ई-पॉस मशीनला येणार्‍या समस्या जाणून घेण्यासाठी पुरवठा विभागाचे अधिकारी थेट रेशन दुकानांमध्ये पोहोचले आहेत. मशीनला येणार्‍या समस्यांचा अहवाल शासनास सादर केला जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात बहुतांश रेशन दुकानांत रविवारी (दि. 30) मशीनची समस्या कायम आहे.

स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेमधील भ्रष्टाचाराला आळा घालताना लाभार्थ्यांना वेळेत रेशन उपलब्ध व्हावे या उद्देशाने शासनाच्या पुरवठा विभागाने काही वर्षांपूर्वी ई-पॉस मशीन प्रणाली आणली. मात्र, मशीनच्या समस्यांमुळे पहिल्या दिवसापासून ही प्रणाली वादात अडकली आहे. त्यातच गेल्या महिन्यात सर्व रेशन दुकानांमधील मशीनचे अपडेशन केले. पण, दिवाळीत आनंदाचा शिधा किट वितरणात आलेल्या समस्यांमुळे मशीनच्या समस्या कायम असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले. राज्याच्या पुरवठा विभागाने या सर्व प्रकारची दखल घेत थेट रेशन दुकानात जाऊन मशीनच्या समस्या जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुरवठा विभागाने सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी तसेच शिधावाटप नियंत्रक यांना 29 ते 31 ऑक्टोबरमध्ये रेशन दुकानांमध्ये जाऊन मशीनच्या समस्या जाणून घेण्यास सूचना केल्या आहेत. या पाहणीवेळी समस्यांची नोंद करून त्याचा अहवालच राज्यस्तरावर सादर करायचा आहे. पुरवठा विभागाने घेतलेला हा निर्णय म्हणजे ‘देर आये, पर दुरुस्त आये’ असेच म्हणावे लागेल.

नियमित धान्यासाठी प्रतीक्षा…
शासनाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेशन कार्डधारकांना 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला. गेल्या 10 दिवसांपासून या शिध्यावरून बरेच वादविवादाचे प्रसंग उभे ठाकले. पण, या सर्व प्रकारांत नियमित धान्य वितरणाला फटका बसला आहे. नियमितचे धान्य घेण्यासाठी लाभार्थी दुकानात जात आहेत. परंतु, पुरवठा विभागाकडून धान्य उपलब्ध झाले नसल्याची उत्तरे रेशन दुकानदार देत आहेत. त्यामुळे आनंदाचा शिधानंतर नियमित रेशनसाठी कार्डधारकांच्या नशिबी प्रतीक्षा आली आहे.

The post शासनाचे आदेश : ‘पुरवठ्या’चे अधिकारी पोहोचले रेशन दुकानात appeared first on पुढारी.