शासनाच्या कागदी घोड्यांवर नाचतोय दोनशे कोटींचा रस्ता; नागरिकांचा संताप

निफाड (नाशिक) : तीन तालुक्यांना जोडणाऱ्या हायब्रीड ॲमिनिटी मॉडेल या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने राज्यात मंजूर झालेल्या मोजक्या रस्त्यांपैकी असलेला सुरत- वघई मार्ग वन्यजीव आणि बांधकाम विभागाच्या वादात रखडला असून, हा रस्ता अर्धवट खोदल्‍यामुळे अपघातात वाढ झाली आहे. परिणामी, दोनशे कोटींचा रस्ता शासनाच्या दोन विभागांच्या वादातून थांबला आहे. तर सत्ताधारी आमदार अन्‌ हेवीवेट नेत्यांच्या मतदारसंघातील रस्त्याच्या कामाला ब्रेक कसा लागू शकतो, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

खोदलेल्या रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले 

सुरत- वघई- वणी- पिंपळगाव बसवंत ते निफाडपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्णत्वास येत असताना निफाड ते सिन्नर दरम्यानच्या रस्त्याचे कामदेखील प्रगतिपथावर आहेत. मात्र, वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारास सदर काम त्वरित थांबविण्याची ताकीद दिली आहे. त्यामुळे रस्ता कामाचा ठेका घेतलेल्या एबीबी कन्स्ट्रक्शनच्या सेवकांनी तातडीने मशिनरी काढून घेतली आहे. हा रस्ता अनेक ठिकाणी खोदून ठेवल्यानंतर वन्यजीव विभागाने रस्त्याचे काम बंद केल्याने रस्त्यावर पडलेली खडी, खोदलेल्या रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्ता मजबुतीकरणासाठी एका बाजूने रस्ता खोदल्याने उर्वरित निम्म्या रस्त्यावरून वाहनांची ये-जा सुरू असल्याने वाहन चालविताना वाहनधारकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. 

वाहनचालकांचा समस्यांचा सामना करावा लागणार 

अनेकवेळा वाहनचालकांमध्ये लहान-मोठ्या चकमकी झडत आहे. तर या रस्त्यामुळे मांजरगाव येथील महिलेचा बळी गेला. खानगाव थडी येथील तरुणाचे चारचाकी वाहन नादुरुस्त झाले होते. सध्या गोदाकाठ भागात ऊस तोडणीचा हंगाम सुरू असून, थोड्याच दिवसांत द्राक्ष हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे ऊस वाहतूक व शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचा अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे.

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

सुरत- वघई रस्त्याचे काम थांबविणे चुकीचे आहे. रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे. या भागातील रस्त्यांचा विकास होत असताना वन्यजीव विभागाने हा रस्ता बंद करण्यास सांगितले आहे. त्यामुळे सध्या काम बंद आहे. परंतु अशाप्रकारे काम बंद करणे चुकचे आहे. वन्यजीव विभागाने तातडीने हे काम सुरू करण्यास परवानगी द्यावी. - दिलीप बनकर, आमदार, निफाड

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच