नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नाशिकमध्ये गाजांचा साठा करून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. शाहरूख शहा रफीक शहा (२९, रा. मेहबूब नगर, वडाळागाव) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. तसेच पोलिसांनी शाहरुखच्या घरातून २८ किलो ११५ ग्रॅम वजनाचा गांजाचा जप्त केला आहे.
पोलिस तपासात शाहरुखकडे सापडलेला गांजाचा माल धुळे जिल्ह्यातील शिरपूरमार्गे नाशिकमध्ये पुरवण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर संशयित गांजाची चोरीछुप्या पद्धतीने विक्री करणार होता. युनिट एकचे अंमलदार मुक्तार शेख यांना शाहरुखच्या घरात गांजाच्या साठा असल्याची माहिती मिळाली हाेती. पाेलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डाॅ. सीताराम काेल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या सूचनेनुसार, पथकाने (दि. २८) राेजी सायंकाळी शाहरुखच्या घराची झडती घेतली. तेव्हा पथकाच्या हाती चार लाख ३१ हजार ७२५ रुपयांचा गांजाचा साठा लागला.
एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा
पोलिसांनी गांजासह संशयिताचा मोबाइलही जप्त केला आहे. पोलिसांनी शाहरुख विरोधात इंदिरानगर पाेलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहायक उपनिरीक्षक सुरेश माळोदे, हवालदार रमेश कोळी, महेश साळुंके आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
शिरपूरच्या दिशेने तपास
शाहरुख याने शिरपूर येथून गांजा आणल्याची माहिती पाेलिसांना समजली. त्यानुसार इंदिरानगर पाेलिस तपासासाठी शिरपूरला जाण्याची शक्यता आहे. संशयिताने काही दिवसांपूर्वी शिरपूरहून गांजा आणून घरात साठा केला. त्यानंतर त्याने गांजाची विक्री करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शाहरुख याने कोणाकडून गांजा खरेदी केला, किती गांजा आणला व त्याची विक्री कोणाला केली याचा तपास पोलिस करीत आहेत.
हेही वाचा –