शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात : सुषमा अंधारे

सुषमा अंधारे

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेत बंडखोरी करुन शिंदे गटात दाखल झालेले आमदार स्वगृही परत येतील, त्यांच्यासाठी परतीचे दोर कापलेले नाही, असे वक्तव्य शिवसेना (ठाकरे गटाच्या) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे. मी कधीही या बंडखोर आमदारांना शत्रू म्हटलेले नाही, ते सर्व माझे भाऊ आहेत, संजय शिरसाठ हे आमच्या संपर्कात आहेत, असा दावाही करत सुषमा अंधारेंनी केला. शिवसेनेच्या (ठाकरे गट) महाप्रबोधन यात्रेनिमित्त उपनेत्या सुषमा अंधारे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्या तालुकानिहाय सभा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. जळगाव शहरात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि आम्ही संयमित भाषेचा वापर करत आहोत. आम्ही टीका करताना कधीही पातळी सोडणार नाही. परतीचे दोर आमच्याकडून कापले गेले नाहीत, असे सूचक विधान सुषमा अंधारे यांनी केले. तसेच हिंदुत्वावर भूमिका स्पष्ट करताना, मला सर्व धर्माबाबत आदर आहे. स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमधील परिषदेत हिंदुत्व सांगितले ते महत्त्वाचे आहे, असे सुषमा अंधारे यांनी नमूद केले.

आमदार संजय शिरसाट अस्वस्थ…

शिंदे गटात असलेले आमदार संजय शिरसाट हे अस्वस्थ असून ते आमच्या संपर्कात आहेत. आमदार शिरसाट यांना पश्चाताप होत असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला. तसेच बच्चू कडू हे लढाऊ आणि स्वाभिमानी आहेत. त्यांच्यावर आरोप होणे हे चुकीचे आहे. मात्र, रवी राणा हे उथळ व्यक्तिमत्त्वाचे असून, चर्चेत राहण्यासाठी ते सतत काहीतरी बोलत असतात, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

हेही वाचलंत का?

The post शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात : सुषमा अंधारे appeared first on पुढारी.