जळगाव: सुरुवातीला शिक्षकांची पन्नास टक्के रिक्त पदे भरले जातील. आधार व्हेरिफिकेशन संदर्भात असलेल्या अडचणी दूर झाल्यानंतर ८० टक्के रिक्त पदांची भरती करण्यात येईल. अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी फैजपूर येथे दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या ६२ व्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनाचा फैजपूर येथे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय पाटील हे होते. आमदार शिरीष चौधरी, कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे.के.पाटील,मागील अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाष माने, उपाध्यक्ष महेंद्र गणपुले,विजय पवार, सारथीचे संचालक विलास पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, सचिन परदेशी, एजाज शेख आदी उपस्थित होते.
शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, टप्पा अनुदानाच्या बाबतीत ३१ डिसेंबरपूर्वी निर्णय घेतला जाईल. पवित्र पोर्टल वरील रिक्त पदांच्या शिक्षक भरतीसाठी रोस्टर पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी रोस्टर पूर्ण करून ठेवावे. सुरुवातीला जिल्हा परिषदची रिक्त पदांची भरती झाल्यानंतर लगेच खाजगी माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
केसरकर म्हणाले, २००५ पूर्वी नेमणूक झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना पेन्शनच्या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल. शिक्षक पुढची पिढी घडवतो त्यांना समाजात मान मिळाला पाहिजे. समूह शाळा, दत्तक शाळा याचे उद्देश्य कोणतीही शाळा बंद करणे हे नसून सर्व शाळांना उत्तम शिक्षण व सुविधा मिळणे हे आहे तरी याबद्दल गैरसमज करू नये. सर्व शाळांना शासकीय शाळेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करणार आहे, असे जर झाले तर केंद्राकडून अनेक सुविधा सर्व शाळांना मिळतील. पुढील वर्षापासून व्यावसायिक शिक्षणावर भर दिला जाणार आहे तसेच कृषी विषयाचा समावेश अभ्यासक्रमात केला जाणार आहे. असे त्यांनी सांगितले.
शालेय पोषण आहारामध्ये रोजच खिचडीच्या ऐवजी नवीन चांगले मेनू दिले जाणार आहेत तसेच आठवड्यातून एकदा अंडे दिले जाईल. आपल्या अनेक प्रलंबित समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न केला आहे परंतु पुढचे वर्ष हे विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे वर्ष आहे,सर्व जणांनी मिळून महाराष्ट्र शिक्षणात पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षाही शिक्षणमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
सकाळच्या सत्रातमध्ये शोधनिबंध सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्यातर्फे सादर करण्यात आला. त्याचा मुख्य विषय माध्यमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकासात मुख्याध्यापकाची भूमिका हा होता तसेच माजी प्राचार्य डॉक्टर विलास पाटील यांनी माध्यमिक शाळा व मुख्याध्यापक या विषयावर व्याख्यान दिले.
राज्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या एकूण ५४ मुख्याध्यापकांचा राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
The post शिक्षकांची ८० टक्के रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील : शालेय शिक्षणमंत्र्यांची ग्वाही appeared first on पुढारी.