शिक्षकांच्या बदली धोरणाबाबत लवकरच शासन निर्णय; शिक्षक समितीला मुश्रीफ यांचे आश्वासन 

देवळा (जि. नाशिक) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (ता. १६) मुंबई येथे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेत शिक्षक बदली धोरणाबाबत सविस्तर चर्चा केली. शिक्षक समितीचे राज्य नेते काळूजी बोरसे-पाटील, राज्य कोशाध्यक्ष केदूजी देशमाने यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

मंत्रालयाच्या समिती कक्षामध्ये झालेल्या बैठकीत प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेविषयी चर्चा झाली. त्यात आठ दिवसांत बदली धोरणाबाबत नवीन शासन निर्णय जाहीर होणार असून, बदल्यांमधील खो-खो पद्धत बंद होणार याबाबत आश्वासित करण्यात आले. बदली कालावधी मोजताना ३१ मेऐवजी ३० जून अशी तारीख गृहीत धरण्याबाबत संघटनांनी आग्रही भूमिका मांडली. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले. तसेच विनंती बदल्या करताना आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची पूर्वीच्या जिल्ह्यातील नियुक्ती तारीख धरण्याबाबत मागणी करण्यात आली. या वेळी ग्रामविकास विभागाचे उपसचिव बांदेकर, कक्ष अधिकारी भांडारकर, खासगी सचिव रवींद्र पाटील, कोल्हापूर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संदीप मगदूम, दिनकर खाकरे, कागल तालुकाध्यक्ष अरविंद पाटील, चांदवड तालुकाध्यक्ष शिवाजीराजे शिंदे उपस्थित होते. 

 हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर