शिक्षकांना बाजारात उभे करू नका; मुख्यमंत्र्यांना राऊतांचा टोला

संजय राऊत

सिडको  (नाशिक): पुढारी वृत्तसेवा –  महाराष्ट्राला शिक्षण आणि शिक्षकी पेशाची मोठी परंपरा आहे. मुख्यमंत्री जर शेअर बाजाराप्रमाणे शिक्षकांचा भाव लावत असतील, तर आपल्या परंपरेला मोठा तडा जाताना दिसतोय. महाराष्ट्रावरील संस्कारांची थोडी जरी जाण असेल, तर शिक्षकांना या बाजारात उभे करू नका, असा जोरदार टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. सध्याचे सरकार अस्थिर असून ते ज्या दिवशी कोसळेल, त्या दिवशी पहिली कारवाई निवडणूक आयोगाच्या तीन अधिकाऱ्यांवर होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

नाशिक शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. संदीप गुळवे यांच्या प्रचारासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत हे नाशिक येथे आले असताना, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी स्ट्राइक रेटबद्दल केलेल्या विधानाचा त्यांनी समाचार घेतला. त्यांनी पैशाने स्ट्राइक रेट विकत घेतला आणि जागा लुटल्या. मुख्यमंत्र्यांनी नाशिक येथे हेलिकॉप्टरमधून २० कोटी कसे उतरवले. अंगरक्षक त्या बॅगा कसे पेलवत होते, हे सगळ्या जगाने पाहिले. आतादेखील ते कशासाठी येऊन गेले, हेही सगळ्यांना माहीत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने 100 हून अधिक जागा ओरबाडल्या. 500 ते 1500 च्या फरकाने जिंकलेल्या जागांपैकी बहुतांश ठिकाणी दिल्लीच्या दबावातूनच निर्णय फिरवण्यात आले. धुळे येथे सात यंत्रांची मतगणना बाकी असतानाच भाजपचा उमेदवार लगेच विजयी घोषित करा, असा दबाव महाराष्ट्रातील भाजपचे सत्ताधारी तसेच केंद्रातील वरिष्ठ सत्ताधारी फोन करून जिल्हाधिकाऱ्यांवर टाकत होते. काँग्रेसच्या सतर्कतेमुळे परत व्यवस्थित मोजणी झाली आणि ती जागा काँग्रेसने जिंकली, असे त्यांनी सांगितले.

दिंडोरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर भगरे यांना नावापुढे गुरुजी लावू दिले नाही. मात्र, भाजपने तिसरीपर्यंत शिकलेल्या बाबू भगरे याच्या नावासमोर सर उपाधी लावून घेतली. त्याने कुठलाच प्रचार न करता पिपाणी चिन्हावर लाखभर मते मिळवली. लोकांना फसवून मते घेणे, विजय प्राप्त करून घेणे हे लोकशाहीला मान्य नाही. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही मतदारांना भ्रमित करून नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांना उभे केले हे दुर्दैव आहे. यातून मार्ग काढावाच लागेल. आमच्या सर्वेक्षणानुसार आमची काही लाख मते नकली शिवसेनेला गेली. कारण खरी शिवसेना समजून लोकांनी धनुष्यबाणाला मतदान केले, असा दावा त्यांनी यावेळी केला. यावेळी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार ॲड. संदीप गुळवे, महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना सर्वाधिक टार्गेट

केंद्राकडून शासकीय-प्रशासकीय पातळीवर सगळ्यात जास्त शिवसेनेला लक्ष्य करण्यात आले, असेही ते म्हणाले. निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा केला, त्यांच्यावरच सगळ्यात आधी कारवाई झाली पाहिजे. लोकशाहीची हत्या, वस्त्रहरण रोखण्याची जबाबदारी असतानाही आयोगाने डोळ्यावर पट्टी बांधून घेतली, असेही ते म्हणाले.

हेही  वाचा: