नाशिक : पुढारी वृत्तसेवा – नाशिक विभाग शिक्षक मतदासंघासाठी येत्या बुधवारी (दि. २६) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूकीसाठी मतदार म्हणून नोंदणी केलेल्या शिक्षकांनी त्यांच्या मतदानाचा हक्क अवश्यपणे बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
शिक्षक मतदारसंघासाठी मतदान हे मतपत्रिकेद्वारे घेतले जाणार आहे. त्याअनुषंगाने मतदारांनी मतदान कसे करावे याबाबत निवडणूक आयोगाने काही सूचना केल्या आहेत. मतदानावेळी सदर सूचनांचे पालन करुन मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन प्रशासनाने शिक्षकांना केले आहे.
असे करावे मतदान
- मतदानवेळी मतपत्रिकेसोबत पुरविलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचाच वापर करावा. अन्य कोणताही पेन, पेन्सिल, बॉल पॉईंट पेन किंवा इतर साहित्याचा वापर करू नये.
- मतदान पंसतीक्रमानुसार (order of preference) असल्याने मतदारांनी पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात १ हा अंक लिहून मतदान करावे (१ हा अंक फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर लिहावा. त्यापुढील पसंतीक्रम जसे 2, 3, 4…… नोंदविणे ऐच्छिक आहे).
- जेवढे उमेदवार निवडणूक लढवित आहेत त्या सर्वांचे संख्येइतके पसंतीक्रम मतदाराला नोंदविता येईल.
- मतपत्रिकेवर नमूद करावयाचा पसंतीक्रम केवळ अंकामध्ये व एकाच भाषेत (देवनागरी, इंग्रजी, रोमन किंवा राज्य घटनेतील आठव्या परिशिष्टामध्ये नमूद कोणतीही इतर भाषा) नमूद करावयाचा आहे. (उदा : १, २, ३, ४, ५…. किंवा 1, 2, 3, 4…. किंवा I, II, III, IV, V….) पसंतीक्रम शब्दात (एक, दोन, तीन…. इ) लिहू नये.
- पंसतीक्रमानुसार उमेदवारापुढे ‘✖️’किंवा ‘✔️’ अशी खूण करू नये.
- मतपत्रिकेवर नवा/कोणताही शब्द किंवा कुठेही सही/अंगठा करू नये.
मतपत्रिका बाद केव्हा ठरेल
- पसंतीक्रम 1 लिहीला नसेल
- 1 हा पसंतीक्रम एकापेक्षा जास्त उमेदवारास दिला असल्यास
- पसंतीक्रम १ नक्की कोणत्या उमेदवाराला आहे? याचा बोध होत नसल्यास
- पसंतीक्रम 1 लिहल्यानंतर त्याच उमेदवारासमोर 2, 3, 4, 5…. असे पसंतीक्रम लिहल्यास
- पसंतीक्रम शब्दात (एक, दोन ….इ) असा नोंदविल्यास
- पसंतीक्रमाबरोबर इतर कुठल्यातरी प्रकरची खूण असणे (सही करणे, नाव लिहीणे, अंगठा देणे, “✖️” किंवा “✔️” इ) ज्यामुळे मतदाराची ओळख पटेल
- मतदान केंद्रावर पुरविलेल्या जांभळ्या शाई व्यतिरिक्त इतर शाईने पंसतीक्रम लिहील्यास
- मतपत्रिकेवर पसंतीक्रम वेगवेगळ्या भाषेत लिहल्यास उदा. 1,2,3,4…. तसेच 1, 2, 3, IV….
हेही वाचा: