देवळा (नाशिक): पुढारी वृत्तसेवा – लोकसभेची निवडणुकीची शांतता होत नाही तोच देवळा तालुक्यात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीने जोर धरला असून, महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांबरोबरच अपक्ष उमेदवाराने देखील जोर धरला आहे. तालुक्यात शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमुळे चांगलीच रंगत येत असून त्याबरोबरच उमेदवारांकडून मेळाव्याच्या माध्यमातून जेवणावळीच्या पंगतीवर भर दिला जात आहे.
महायुतीचे उमेदवार किशोर दराडे, महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. संदीप गुळवे व अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांच्या समर्थकांनी मतदारांच्या घरी जाऊन भेटी गाठी देण्यावर भर दिला आहे. २६ जून रोजी मतदान होणार असल्याने निवडणूकीची तयारी अंतिम टप्प्यात असून तिघेही उमेदवारांकडून मेळाव्याच्या माध्यमातून जेवणावळीच्या पंगतीवर भर दिला गेला. शिक्षक मतदारांनी तिघाही उमेदवारांच्या मेळाव्याला चांगला प्रतिसाद दिला असून यात विशेष म्हणजे मागील निवडणुकीत किशोर दराडे यांनी विजय मिळविला असल्याने पाच वर्षात मतदार संघातील शिक्षकांशी दांडगा संपर्क ठेऊन त्यांच्या कार्यकाळात प्रत्येक वर्षी दिवाळीभेटीच्या रुपेने भेटी दिल्या आहेत.
तसेच तालुक्यातील बहुसंख्य शाळांना संगणक उपलब्ध करून दिल्याने ती त्यांची जमेची बाजू जरी असली तरी नाशिक जिल्ह्यातून नव्याने मराठा विद्या प्रसारक समाजाच्या संचालक असलेल्या कै. गोपाळराव गुळवे यांचे चिरंजीव ॲड. संदीप गुळवे यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन ठाकरे गटात प्रवेश करून महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवली आहे. त्यांना सत्ताधारी मराठा विद्या प्रसारक संस्थेचा किती लाभ होतो हे ह्या निवडणुकीतून दिसून येणार आहे. तर तिसरे उमेदवार विवेक कोल्हे हे गेली अनेक वर्षे मराठा विद्या प्रसारक संस्थेमध्ये सत्ता उपभोगलेल्या नीलिमा पवार यांचे ते भाचे आहेत. त्यामुळे त्यांना नाशिक जिल्ह्यात मविप्रच्या मतदाराचा नीलिमा पवारांमुळे किती लाभ होतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे. देवळा तालुक्यात तिघेही उमेदवार बरोबरी असली तरी अर्थकारणाच्या पाकिटावर निवडणुकीचे गणित अवलंबून असते अशी मतदारांमध्ये चर्चा ऐकीवात आहे.
हेही वाचा: