‘शिक्षक’ साठी शिंदे, दादा गटांचे स्वतंत्र तर भाजपचा छुपा उमेदवार मैदानात

Nashik Teachers’ Constituency : लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवातून महायुतीचे नेते धडा घ्यायला तयार नसल्याचे चित्र सध्या दिसत येत आहे. वरवर पाहता पाहता या निवडणुकीत राजकीय पाठबळासह नातीगोती निर्णायक ठरण्याची शक्यता गडद वाटत आहे.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवातून महायुतीचे नेते धडा घ्यायला तयार नसल्याचे चित्र सध्या दिसत येत आहे. विधान परिषद नाशिक शिक्षण मतदारसंघ निवडणुकीमध्ये महायुती घटक असलेल्या दोन पक्षांनी स्वतंत्र, तर भाजपने छुपा उमेदवार दिल्याने तीनही पक्षांतील बेबनाव बघायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाने विद्यमान आमदार किशोर दराडेंना, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ॲड. महेंद्र भावसार यांना प्रत्यक्ष रिंगणात उतरवले आहे. कोपरगावचे विवेक कोल्हे अपक्ष उमेदवार म्हणून लढत देत असले तरी त्यांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याची वंदता आहे. स्वाभाविकच ही निवडणूक महायुतीकडून स्वबळाकडे जाताना दिसत असल्याने वर्चस्वाच्या लढाईत महाविकास आघाडी त्याचा लाभ उचलते का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

यांनी घेतली होती माघारी…

  • किशोर प्रभाकर दराडे – अपक्ष
  • संदीप नामदेवराव गुळवे – अपक्ष
  • शेख मुखतार अहमद – अपक्ष
  • रूपेश लक्ष्मण दराडे – अपक्ष

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाने मविप्र संचालक ॲड. संदीप गुळवे यांचा पक्षप्रवेश करत त्यांना उमेदवारी दिली. त्यानंतर लगेचच ॲड. भावसार यांनी अजित पवार गटाचा एबी फॉर्म जोडून अर्ज भरला. विद्यमान आमदार दराडेंनी शिंदे सेनेकडून अर्ज भरला आणि त्याचवेळी काँग्रेसने डी. बी. पाटील यांना एबी फॉर्म देत उमेदवारी करण्यास सांगितले. अपक्ष म्हणून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे आणि कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे यांनी अपक्ष अर्ज भरला. माघारीच्या दिवशी यापैकी महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवार पाटील, तर अपक्ष उमेदवार डॉ. विखे यांनी अर्ज मागे घेतले.

विभागाचा विचार करता अहमदनगरमध्ये थोरात, विखे, तांबे, कोल्हे या घराण्यांचे राजकीय वर्चस्व आहे. अपक्ष असूनही क्षेत्रीय अस्मिता म्हणून चारही तुल्यबळ नेत्यांचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष कोल्हेंना पाठिंबा मिळू शकतो. सत्यजित तांबे यांना विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीवेळी कोल्हेंनी केलेल्या मदतीची परतफेड यावेळी कोल्हेंना होऊ शकते. राजेंद्र विखे यांनी घेतलेली माघार घेणे कोल्हेंसाठी शुभशकुन आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात विरोधी बाकावर असले तरी जिल्ह्यातील उमेदवार म्हणून कोल्हेंना ते सॉफ्ट कॉर्नर देऊ शकतात. नाशिक जिल्ह्यात किशोर दराडे आणि ॲड. संदीप गुळवे असे दोन उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्यात मतांची विभागणी होऊ शकते. तसेच कोल्हे यांचे बरेचसे आप्तस्वकीय नाशिकमध्ये शिक्षक मतदार आहेत. त्यांना नक्कीच त्याचा लाभ होऊ शकतो. त्याखालोखाल मतदारांची संख्या असलेल्या जळगावमध्ये शिक्षकांची पाहिजे तशी मोट बांधली गेली नाही. त्यामुळे तेथेदेखील राजकीय प्रभाव निर्णायक ठरू शकतो. धुळ्यामधून अजितदादा गटाचे उमेदवार ॲड. भावसार स्थानिक म्हणून प्रभावी ठरू शकतात. नंदुरबारमधून शिक्षक संघटना प्रभावीपणे अस्तित्वात नसल्याने त्या ठिकाणीदेखील राजकीय प्रभावातून मतदान होण्याची शक्यता आहे.

राजकीय पाठबळासह नातीगोती निर्णायक…

एकीकडे उमेदवारांना राजकीय पाठबळ मिळत असताना दुसरीकडे शैक्षणिक संस्थांचा आधारही त्यांच्यासाठी निर्णायक ठरणार आहे. रयत आणि मविप्र या राज्यातील बिनीच्या शैक्षणिक संस्थांनी ॲड. गु‌ळवेंना पाठिंबा दिला आहे. अर्थात, मविप्र संस्थेच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार यांचे कोल्हे हे जवळचे नातलग असल्याने पवार त्यांच्यासाठी लीड घेणार हे स्पष्ट आहे. याशिवाय, क. का. वाघ संस्थेचे अध्यक्षही कोल्हेंच्या नात्यातील आहेत. नाशिकमधून विद्यमान आमदार दराडे यांना स्वत:ची मातोश्री शैक्षणिक संस्था तसेच वसंतराव नारायणराव नाईक संस्थेकडून मदत मिळू शकते. त्यामुळे वरकरणी पाहता या निवडणुकीत राजकीय पाठबळासह नातीगोती निर्णायक ठरण्याची शक्यता गडद वाटत आहे.

हेही वाचा: