शिक्षण घेऊनही नोकरी मिळेना! अभियांत्रिकीच्या तब्बल साडेसहा लाख जागांमध्ये घट 

नामपूर (जि. नाशिक) : एकेकाळी तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ व सामाजिक प्रतिष्ठा असलेल्या अभियांत्रिकीच्या (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रमाला काही वर्षांपासून उतरती कळा लागली आहे. राज्यासह देशभरात दर वर्षी लाखो जागा रिक्त असल्याचे चित्र आहे. अभियांत्रिकी पदवीच्या भरवशावर नोकरी मिळवणाऱ्यांची संख्या कमी आहे. याचा परिणाम प्रवेशावर झाल्याने महाविद्यालयांनी पाच वर्षांत जागा कमी करण्याचे ठरवले. यातूनच २०२०-२१ पर्यंत अभियांत्रिकी शाखेतील सहा लाख ५५ हजार ३९६ जागा घटल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी देशातील तीस लाखांवर असलेल्या जागा थेट २४ लाखांवर आल्या आहेत. 

 नोकरीची हमी नसल्याने विद्यार्थ्यांचा ओढा कमी

शहरी भाग वगळता ग्रामीण भागातील महाविद्यालयांमधील पायाभूत सुविधांचा अभाव, विद्यार्थ्यांना बाहेरच्या जगात आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञानाचा अभाव, तसेच पात्र शिक्षक, प्राचार्यांची कमतरता यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे औद्योगिक क्षेत्राचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. सध्या उद्योग क्षेत्रात मंदीची चर्चा असल्याने रोजगार मिळण्याच्या शाश्वतीबाबत विद्यार्थी चिंतेत आहेत. ज्या संस्थांमध्ये चांगले तंत्रज्ञान, शिक्षक आहेत. तेथे विद्यार्थी जातात. खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेशशुल्क जास्त असते. त्याच तुलनेत तिथे यंत्रसामग्री आणि सुविधा दिल्या जातात. त्यामुळे या विद्यापीठांत विद्यार्थी जातात. हे देशभरातील चित्र आहे. परंतु अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊनही बेरोजगारीचा सामना करावा लागत असल्याने काही वर्षांत अभियांत्रिकीला वाईट दिवस आले आहेत. पाच वर्षांत देशातील अभियांत्रिकीच्या लाखो जागा घटल्याचे वास्तव समोर आले आहे. 
स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर सुरवातीला देशात अभियांत्रिकी महाविद्यालयांचे पीक आले. प्रवेशासाठी चक्क रांगा लागायच्या. नोकरीची हमी आणि अभियंत्यांना असलेली प्रतिष्ठा बघून अनेक विद्यार्थी अभ्यासक्रमाकडे वळायचे. मात्र गेल्या पाच वर्षांत अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊनही अनेक विद्यार्थी बँक, स्पर्धा परीक्षा व अन्य नोकरीचा पर्याय निवडत आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयांची बेसुमार वाढलेली संख्या आणि बाजारपेठेला आवश्यक मनुष्यबळाचा अभाव यामुळे दर वर्षी उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या अभियंत्यांमध्ये बेरोजगारीचा आलेख वाढत चालला आहे. 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

पाच वर्षांतील विद्यार्थ्यांची घटणारी संख्या 

२०१५-१६ : ३०,९३,४२६ 
२०१६-१७ : २९,९९,१३८ 
२०१७-१८ : २५,७०,६८८ 
२०१८-१९ : २७,११,८७८ 
२०१९-२० : २५,४१,१५२ 
२०२०-२१ : २४,४०,०३० 

राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची प्रवेशक्षमता उंचावलेली आहे. या संस्थांमधून दर वर्षी हजारो विद्यार्थी बाहेर पडत आहेत. बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याच्या संधी कमी झाल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शासनाने राज्यात विविध विभागांत रिक्त असलेली पदे तातडीने भरावीत. 
- नितीन पगार, अभियांत्रिकी पदविकाधारक

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल