नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आजच्या स्पर्धात्मक युगात आपले वेगळेपणा टिकवून ठेवण्याबरोबरच विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना सक्षम करण्याची गरज आहे. ही गरज टॅलेंट सर्च परीक्षेच्या माध्यमातून पूर्ण होत असल्याने प्रतिपादन आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राजन पाटील यांनी केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागांतर्गत टॅलेंट सर्च परीक्षेसाठी आयोजित शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. राजूर (ता. अकोले) येथे बुधवारी (दि.14) ही कार्यशाळा झाली.
यावेळी लेखाधिकारी अभिजित खेडकर, सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) नानासाहेब झरेकर, शिक्षण विस्तार अधिकारी प्रशांत हसे, विठ्ठल झनन, तज्ज्ञ प्रशिक्षक समाधान हिरे, दैनिक पुढारी विभाग व्यवस्थापक (नाशिक) राजेश पाटील आदी उपस्थित होते.
पुढे प्रकल्प अधिकारी पाटील म्हणाले की, सध्याचा काळ हा स्पर्धेचा आहे. तसेच भविष्यात सर्वच क्षेत्रांतील स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे. या स्पर्धेत विद्यार्थी टिकून राहावे तसेच त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करावी यासाठी त्यांच्यातील सुप्त गुणवत्तेला शालेय जीवनापासूनच आकार देण्याची गरच आहे. आदिवासी विकास विभागाकडून त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जनमानसात रुजलेल्या दैनिक ‘पुढारी’चे टॅलेंट सर्च परीक्षेसाठी बळ लाभले आहे. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण होणे शक्य होणार आहे. तसेच भविष्यात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये टॅलेंट सर्च उपक्रमातील विद्यार्थी झळकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यशाळेत तज्ज्ञ प्रशिक्षक समाधान हिरे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचा शिक्षकांना लाभ होणार असल्याचे स्पष्ट केले. दैनिक ‘पुढारी’ विभाग व्यवस्थापक पाटील यांनी स्पर्धा परीक्षेप्रमाणे या परीक्षेतील उत्तरपत्रिकेचे तज्ज्ञ याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अभ्यास पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी वितरण प्रमुख शरद धनवटे व दिलीप गुरकुले यांनी सहकार्य केले. तर कार्यशाळेचे संयोजन प्रमोद शिंदे, श्रीमती जाधव व दहिवळकर यांनी केले.
शिक्षकांना अभ्यास करून घेण्याच्या टीप्स यावेळी तज्ज्ञ प्रशिक्षक समाधान हिरे यांनी टॅलेंट सर्च परीक्षेचा उद्देश, महत्त्व, शंकासमाधान, उत्तरपत्रिकेची माहिती, तांत्रिक बाबी, शिक्षकांना विषयवार मार्गदर्शन, क्लृप्त्या, विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेण्याची पद्धत याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत 45 शिक्षक उपस्थित हाेते.
The post शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळेला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद appeared first on पुढारी.