शिक्षण विभागाकडून डिसेंबरपर्यंतच्या सुट्या जाहीर; जिल्हा परिषद शाळांना ४६ सुट्या 

येवला (जि. नाशिक) : जिल्हा परिषदेच्या शाळा अद्याप सुरू नसल्या तरी विद्यार्थ्यांना आगामी वर्षभरात द्यावयाच्या सुट्यांची यादी शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी जाहीर केली. त्यानुसार शाळांना वर्षभरात तब्बल ७६ सुट्या मिळणार असून, चालू शैक्षणिक वर्षाअखेर जूनपर्यंत तब्बल ४६ सुट्यांचा लाभ मिळणार आहे. 

जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक शिक्षण व आरोग्य सभापती सुरेखा दराडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. समितीच्या बैठकीत २०२१ या वर्षात प्राथमिक शाळांना दिल्या जाणाऱ्या सुट्यांची यादी मंजूर करण्यात आली. या सुट्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही सुट्या शाळांना देऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मोठ्या सुट्यांच्या दिवसात सोपवलेली कामे व मागितलेली माहिती मुदतीत दिली जावीत, विशेष म्हणजे या काळात परगावी जाताना संपर्क क्रमांक मुख्याध्यापकांकडे द्यावेत, असे म्हसकर यांनी म्हटले आहे. स्थानिक सुटी एकच घेता येणार असून, एकूण ७६ दिवसांपेक्षा अधिक सुट्या घेऊ नयेत. शिक्षकांचे वर्षभरातील कामाचे दिवस किमान २२० पेक्षा कमी नसावेत तसेच अध्यापनाचे घड्याळी तास एक हजारापेक्षा कमी नसावेत, असा नियम आहे. चालू वर्षात जितक्या मुदतीपर्यंत शाळा बंद राहतील, त्या मुख्याध्यापकांनी तितक्या मुदतीत आपल्या शाळा मोठ्या सुटीत सुरू ठेवाव्यात आणि तो कालावधी भरून निघाल्यानंतर काही दिवस सुटी घ्यावी, असेही पत्रात म्हटले आहे. तसेच थोर पुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त सुट्या देण्यात आलेल्या नसून त्यादिवशी कार्यक्रम घेऊन त्यानंतरच्या वेळेत अध्यापनाचे कार्य सुरू ठेवावे लागणार आहे. १ मार्चपासून उन्हाळी सुटीपर्यंत शाळेची वेळ सकाळी साडेसात ते ११.३५ पर्यंतची राहणार आहे. 
जानेवारी ते डिसेंबर या काळात उन्हाळी सुटी ३ मे ते १२ जून अशा ३६ दिवसांची आहे. तर दिवाळीची सुटी २५ ऑक्‍टोबर ते १० नोव्हेंबरपर्यंत पंधरा दिवस मिळेल. याव्यतिरिक्त वर्षभरात २५ सुट्या मंजूर करण्यात आल्या आहेत. 

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय

अशा मिळणार सुट्या... 

या शैक्षणिक वर्षअखेर मकरसंक्रांत, प्रजासत्ताक दिन, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महाशिवरात्री, धूलिवंदन, रंगपंचमी, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, महाराष्ट्र दिन या दहा व ३६ दिवसांची उन्हाळी सुटी मिळणार आहे. जूननंतर नव्या शैक्षणिक वर्षात बिरसा मुंडा जयंती, आषाढी एकादशी, बकरी ईद, पारशी नववर्ष, मोहरम, गोपाळकाला, पोळा, गणेश चतुर्थी, महात्मा गांधी जयंती, घटस्थापना, दसरा, ईद-ए-मिलाद, गुरुनानक जयंती, नाताळ अशा पंचवीस सुट्या मिळणार आहेत. एक स्थानिक सुटी मंजूर असून, ती गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शाळांना मंजूर करून घ्यावी लागणार आहे, तर उन्हाळी सुटीनंतर शाळा १६ जूनपासून पुन्हा सुरू होतील.

हेही वाचा - नियतीने पुन्हा तिचे बाळ 'तिच्या' झोळीत टाकले! मातेचे कोरडे पडलेले डोळे पुन्हा पाणावले