शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

रेशनकार्ड

धुळे : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत वाटप करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्याअंतर्गत धुळे जिल्ह्यात 75 हजार 738 साड्या अंत्योदय शिधापत्रिकाधारकास प्रत्येकी एक याप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यात साड्या प्राप्त झाल्या असून त्याचे वाटप रास्त भाव दुकानात सुरू झाले आहे. तरी सर्व अंत्योदय शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी आपल्या लगतच्या स्वस्त धान्य दुकानातून साडी प्राप्त करून घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

विणलेल्या पिशवीचे मोफत वाटप
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता, त्याचे प्रमाण, फ्री रेशनची उपलब्धता, खर्चाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना सहा महिन्याच्या अंतराने दहा किलोची क्षमता असलेली विणलेली एक पिशवी रास्त भाव दुकानांद्वारे वितरित करण्याचा निर्णय केंद्र शासनामार्फत घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने धुळे जिल्ह्यात एकूण 2 लाख 94 हजार 819 पिशव्या स्वस्त धान्य दुकानातून वाटप होणार आहेत. जिल्ह्यात पिशव्या प्राप्त झाल्यानंतर लवकरच स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना वाटप करण्यात येतील.

पात्र लाभार्थ्यांना प्रती कार्ड एक किलो साखर
शासनामार्फत अंत्योदय कुटुंब योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रती कार्ड एक किलो साखर (20 रु. किलो दराने) दरमहा अनुज्ञेय आहे. त्यानुसार माहे ऑक्टोबर ते डिसेंबर, 2023 या कालावधीची अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना शासनामार्फत साखर मंजूर करण्यात आलेली आहे. तरी अंत्योदय योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी संबधित स्वस्त धान्य दुकानातून माहे ऑक्टोबर ते डिसेंबर, 2023 या तिमाहीची 3 किलो साखर रास्त दुकानदारांकडून प्राप्त करून घ्यावी. संबंधित स्वस्त धान्य दुकानातून उपलब्ध न झाल्यास संबधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी कळविले आहे.

The post शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन appeared first on पुढारी.