शिर्डी मार्गावर वावीजवळ मजुरांचे वाहन उलटून महिला ठार

सिन्नर/वावी  (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – रस्त्याच्या कामावरुन परतणाऱ्या मजुरांच्या पिकअप वाहनाला बुधवारी (दि.19) सायंकाळी 6 च्या सुमारास सिन्नर – शिर्डी महामार्गावर वावी शिवारात भीषण अपघात झाला. त्यात एक महिला ठार तर 20 जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती असून त्यात महिलांची संख्या जास्त आहे. मृत महिलेची ओळख पटलेली नाही.

मजुरी करणाऱ्या महिला कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील रहिवाशी आहेत. त्या दररोज महामार्गाच्या कामावर जातात. दुभाजकांमध्ये लावलेल्या झाडांची नोंदणी खुरपणी आणि निगराणीचे काम त्या करतात. दररोज सकाळी त्या कोळपेवाडी येथून पाथरे व पाथरे येथून पिकअपने (एमएच 14 डीएम 5434) कामासाठी जातात. बुधवारीदेखील नेहमीप्रमाणे सिन्नर- शिर्डी मार्गावर काम आटोपून परतत असताना वावी येथील रंगनाथ पा. गोडगे पब्लिक स्कूलसमोर सायंकाळी सहाच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप उलटली. वाहनात 20 ते 22 महिला व तीन चार पुरुष होते. तीन गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना तातडीने 108 रुग्णवाहिका व पिंपरवाडी टोल नाक्यावरील रुग्णवाहिकेने सिन्नर येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तीन जणांना नाशिक येथे उपचारांसाठी हलविण्यात आले असून त्या जखमींची नावे समजलेली नाहीत. सतरा जणांवर सिन्नरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यात गुड्डी कोळपे, हिराबाई गर्दे, वैष्णवी होंडे, दीपक शेळके, लताबाई बुरुंगले, सुनीता शिवदे, सरुबाई माळी, अनुसया झांबरे, शिल्पा कोळपे, संगीता शिवदे, सुरेखा कोळपे, आदिनाथ इंगळे, ललिताबाई शिवदे, ऋषिकेश पिसाळ, सुमनबाई सूर्यवंशी, अनिता भूतनर, वर्षा गायकवाड आदींचा समावेश आहे.

हेही वाचा: