शिवजन्मोत्सवचा नाशिक रोड पॅटर्न राज्यात हिट! देखावे साकारण्यास सुरवात 

नाशिक रोड  : येथील गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या सर्वपक्षीय, सर्वधर्मीय शिवजयंतीचा पॅटर्न राज्यभर गाजत आहे. सर्व जाती-धर्माचे लोक, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवभक्त शिवजन्मोत्सव सोहळ्याला एकत्र येतात. शिवजन्मोत्सव सोहळ्याची तयारी सध्या युद्धपातळीवर सुरू असून, नाशिक रोड व सैलानी बाबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सध्या सजावट सुरू आहे. 

गेल्या चार वर्षांपासून सर्वपक्षीय शिवजयंती महोत्सवाचा पॅटर्न राज्यात अनेक ठिकाणी अंमलात आणला गेला आहे, यासाठी सर्वपक्षीय, सर्वधर्मीय कार्यकर्ते एकदिलाने शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी सरसावले आहेत. 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

यंदा महाराजांच्या पुतळ्यालगत लाल किल्ला

येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालगत लाल किल्ल्याचा देखावा साकारणार असून, यासाठी कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेत आहेत. जेल रोड येथील सैलानी बाबा येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालगतही सध्या देखावे साकारत असून, आकर्षक रोषणाई केली जात आहे. या वर्षीच्या शिवजन्मोत्सव समितीचे वेगळेपण म्हणजे राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवला होता, म्हणून आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर होणार आहे. विविध ठिकाणी शिवप्रेमींनी होर्डिंग, फ्लेक्स, झेंडे लावून परिसर भगवामय केला आहे. गाड्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र लावण्यात आले असून, दुचाकीवरील झेंडे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. कोरोनामुळे या वर्षी सोशल डिस्टन्स ठेवून शिवजयंती साजरी केली जाणार आहे. त्याची तयारी नाशिक रोड शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विक्रम कोठुळे यांच्यासह कार्यकर्ते करीत आहेत. 

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट

या वर्षी शिवजयंती सोशल डिस्टन्सिंग ठेवून, रक्तदान व आरोग्य शिबिर घेऊन साजरी केली जाणार आहे. यासाठी नाशिक रोड येथील सर्व शिवप्रेमी सहभाग नोंदवीत आहेत. 
-विक्रम कोठुळे, अध्यक्ष, शिवजन्मोत्सव समिती, नाशिक रोड