शिवजयंतीच्या नावाखाली खंडणीची मागणी; संतापजनक प्रकार   

सिडको (जि.नाशिक) : शिवजयंतीच्या नावाखाली कोणीही पावती पुस्तक घेऊन फिरू नये. तसेच वर्गणीच्या नावाखाली आग्रह धरू नये, असे पोलिस वारंवार आवाहन करत असतानाही असा प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे.

लाखो रुपयांची मागणी

शिवजयंतीच्या नावाखाली ॲकॅडमी संचालकांकडे खंडणीचा तगादा लावणाऱ्यांना पोलिसांचा धाक दाखविताच संबंधितांनी पोबारा केल्याची घटना सिडको परिसरात घडल्याची चर्चा आहे. शिवजयंतीच्या नावाखाली कोणीही पावती पुस्तक घेऊन फिरू नये. तसेच वर्गणीच्या नावाखाली आग्रह धरू नये, असे पोलिस वारंवार आवाहन करत असतानाही काही दिवसांपासून सिडको परिसरातील एका खासगी ॲकॅडमी चालकांना लाखो रुपयांची मागणी काही जण करत होते. 

हेही वाचा - अखेर 'त्या' तरुणीच्या मृ्त्यूचे गूढ उकलले; पोलिसांकडून २४ तासात संशयितांना बेड्या 

बड्या नेत्यांची नावे सांगून वर्गणी
आम्ही एका मोठ्या पक्षाचे पदाधिकारी आहोत. त्यामुळे तुम्हाला शिवजयंतीची वर्गणी द्यावीच लागेल. अशा प्रकारचा धमकीवजा तगादा त्यांनी लावला होता. एवढेच नव्हे तर मुंबईतील काही बड्या नेत्यांची नावे सांगून आमचे यांच्याशी उठणे-बसणे आहे, असे दाखवत होते. आम्ही चुकीचे काम करत नाही, असे ॲकॅडमी चालक त्यांना वारंवार सांगत होते. अखेर गुरुवारी दुपारी संबंधित ॲकॅडमीमध्ये आले आणि त्यांनी पुन्हा एकदा पैशांची मागणी केली; परंतु ॲकॅडमी चालकांनी त्यांच्या धमकीला न जुमानता पोलिसांचा धाक दाखविला आणि त्यांनी पोबारा केल्याचे दिसून आले. या संदर्भात संबंधितांचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, क्लास लवकरच या संदर्भात पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे समजते. 

हेही वाचा - इगतपुरीच्या ३०० फूट खोल दरीत तब्बल ११ तासांचा थरार! अखेर रेस्क्यू टिमच्या प्रयत्नांना यश