शिवजयंती मिरवणूक काढणारच! सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा निर्धार

जुने नाशिक : शिवजयंती मिरवणुकीस राज्य सरकारने परवानगी नाकारल्याने शिवजयंती मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांनी त्याचा निषेध करून सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन केले. अचानक झालेल्या आंदोलनाने पोलिसांची तारांबळ उडाली. 
शिवजयंतीनिमित्त शहरात मिरवणूक काढण्यात येते.

परवानगीसाठी ठिय्या आंदोलन 

यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले आहे. शिवाय मिरवणुकीस परवानगी नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली. त्यांनी राज्य सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी (ता. १२) सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी केली. त्यामुळे मुख्य रस्त्यावर काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती. माहिती मिळताच भद्रकालीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे पोलिस फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. आंदोलनकर्त्यांनी त्यांना पाहत ‘जय शिवाजी, जय भवानी’, ‘जय जिजाऊ, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’, अशी घोषणाबाजी केली. पोलिस किंवा प्रशासनाने कितीही बंधने लादली, तरी पारंपरिक मार्गावरून मिरवणूक काढण्यात येईल. शासनाने जाहीर केलेले परिपत्रक मागे घ्यावे. मिरवणुकीस परवानगी द्यावी, असा मागण्या आंदोलनकर्त्यांनी या वेळी केल्या. आंदोलनात शहरातील विविध भागातील सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी व कायकर्ते सहभागी झाले होते. भद्रकाली पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट 

प्रशासनाने विरोध केला, तरी पारंपरिक मार्गाने मिरवणूक काढणारच आहे. सरकारला संघर्ष हवा नसेल, तर त्यांनी मिरवणुकीस परवानगी द्यावी. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन केले जाईल. तरीही परवानगी मिळत नसेल तर आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल. 
-सागर देशमुख, अध्यक्ष, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान 

शिवजयंती साजरा करणाऱ्या पाच मंडळांनी भेट घेतली. ऑनलाईन प्रक्षेपण व रक्तदान शिबिर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अशा कार्यक्रमांना परवानगी आहे. तरीही कार्यक्रम बघून परवानगी देण्यात येईल. मिरवणूक आणि पालखी सोहळ्यास परवानगी नसेल. दहापेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोचविणार आहे. शासनाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करू. 
-दीपक पांडे, पोलिस आयुक्त 

 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी