शिवभक्तांना महाशिवरात्रीला दर्शन बंद दाराआडूनच ; पोलिस प्रशासन ठाम 

पंचवटी (नाशिक) : गुरुवारी (ता. ११) महाशिवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर श्री कपालेश्‍वर महादेव मंदिर बंद राहण्याची शक्यता आहे. संभाव्य गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासन या परिसरात १४४ कलम लावण्याच्या तयारीत असल्याने शिवभक्तांचे दर्शन यंदा बंद दाराआडूनच होण्याची शक्यता अधिक आहे. 

कोरोनाच्या पुन्हा वाढलेल्या उद्रेकामुळे पोलिस प्रशासनाने तीन दिवस मंदिर बंद ठेवण्याचा आदेश दिल्यावर गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल व देवांग जानी यांच्या नेतृत्वाखाली मध्यंतरी पुरोहित संघाच्या कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीत शिवभक्तांच्या आग्रहास्तव देवस्थान खुले ठेवण्याचा आग्रह धरण्यात आला. मात्र, याबाबत पोलिस प्रशासन ठाम असून, कोणत्याही परिस्थितीत कपालेश्‍वर मंदिर बंदच राहील, असा पवित्रा घेण्यात आला. याशिवाय महाशिवरात्रीच्या काळात मंदिर परिसरात होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी या काळात जमावबंदीची तयारीही सुरू केली आहे, त्यामुळे शिवभक्तांच्या आग्रहानंतरही मंदिर बंदच राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर

संबंधितांना नोटिसा 

कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढू लागल्याने प्रशासनाची चिंताही वाढली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत यंदा कपालेश्‍वरी महाशिवरात्रीला शिवभक्तांची गर्दी होणार नाही, याची काळजी प्रशासन घेत आहे. दर्शन खुले होण्यासाठी संबंधितांनी चिथावणीखोर भाषणे सुरूच ठेवली तर संबंधितांना नोटिसा बजावण्याची तयारीही पोलिस प्रशासनाने केली आहे. 

हेही वाचा - काळजावर ठेवला दगड आणि शेतकऱ्याने उभ्या पिकात सोडली मेंढरे! स्वप्न चक्काचूर