शिवसेना जात्यात असून इतर पक्ष भाजपाच्या सुपात आहेत : अनंत गीते

अनंत गिते,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

सध्या राज्याच्या सत्तेत असणारा भारतीय जनता पार्टी हा पक्ष आता भुरट्यांच्या ताब्यात गेला आहे. त्यामुळे या पक्षाच्या मूळ आमदारांनी दुःख व्यक्त करणे, ही बाब गैर नाही. अशा आमदारांनी मदत मागितल्यास त्यांना मदत करणे ही स्वाभाविक बाब आहे असे सांगतानाच भारतीय जनता पार्टीने जे पेरले तेच उगवणार आहे, अशी टीका आज माजी मंत्री तथा शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी धुळ्यात केली आहे.

शिवगर्जना संघर्ष अभियान अंतर्गत आज पक्षाची भूमिका त्यांनी पत्रकारांसमोर मांडली. यावेळी ठाकरे गटाच्या प्रवक्त्या तथा उपनेते संजना गाढे, संपर्कप्रमुख अशोक धात्रक, माजी नगरसेविका उषा मराठे तसेच शुभांगी पाटील, धुळ्याचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे आणि हेमंत साळुंखे माजी आमदार प्रा. शरद पाटील, युवा सेनेचे वरूण सरदेसाई यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी भूमिका मांडताना माजी मंत्री गीते यांनी राज्यातील सत्ता संघर्षावरून भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर टीकेची तोफ डागली आहे. राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षामुळे जनता संभ्रमात आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच खालच्या दर्जाचे राजकारण होते आहे. जनतेने हा प्रसंग कधीही पाहिला नव्हता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कोणताही राजकीय वारसा नसणाऱ्या कार्यकर्त्यांना आमदार आणि मंत्री बनवून त्यांना स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली. अशा राजकीय जन्म देणाऱ्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर भोसकणाऱ्या गद्दारांना भारतीय जनता पार्टीने सोबत घेऊन राजकारण करणे सुरू केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह जनतेच्या मनात संतप्त भावना आहे. राज्यात असणारा हा आक्रोश भविष्यात प्रकट होणारच आहे. मात्र जनतेच्या मनात असणाऱ्या या आक्रोशाला मोकळी वाट करून देण्याचा प्रयत्न या शिवगर्जना संघर्ष अभियानाच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रकल्प थांबविण्याऐवजी 40 गद्दार सांभाळले…

राज्यात सत्तेचे राजकारण असणे समजू शकतो. मात्र सत्तेसाठी राजकारण करणे आणि सत्ता मिळाल्यानंतर शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेकडे दुर्लक्ष करणारे राजकारण सध्या होते आहे हे दुर्दैवी आहे. राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातला स्थलांतरित झाले. पण हे प्रकल्प थांबवण्याऐवजी भारतीय जनता पार्टी हे 40 गद्दारांना सांभाळण्याच्या प्रकल्पाला जास्तीचे महत्त्व देत असल्याचा टोला गीते यांनी लगावला आहे.

भारतीय जनता पार्टीमध्ये असणाऱ्या मूळ भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या मनामध्ये अस्वस्थता असणे ही बाब गैर नाही. सध्या भारतीय जनता पार्टी सत्तेसाठी भुरट्यांच्या ताब्यात गेली आहे. त्यामुळे अस्वस्थ असणाऱ्या आमदारांनी सहकार्य मागितल्यास त्यांना सहकार्य केले जाईल. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीने जे पेरले आहे ते उगवणार आहे. त्यांनी केलेल्या कामाचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. राज्यातील हे सरकार आम्ही पाडणार नसून भारतीय जनता पार्टीच पाडेल, अशी टीका देखील गीते यांनी केली आहे.

शिवसेना जात्यात, इतर पक्ष पाजपाच्या सुपात 

भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात शिवसेना संपवण्यासाठी केलेले राजकारण हे देश पातळीवर तज्ञांकडून पाहिले जाते आहे. देशभरात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असा प्रयोग केला जाण्याची शक्यता आहे. आज शिवसेना जात्यात असून इतर पक्ष भाजपाच्या सुपात आहेत. त्यामुळेच जात्यात जाण्याच्या शक्यतेने सर्व पक्ष शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा देखील गीते यांनी केला आहे.

महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीने केलेल्या राजकारणाचा जनतेमध्ये रोष असून येणाऱ्या निवडणुकांमधून हा रोष दिसणार आहे. राज्यात भविष्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेला किमान 100 जागा मिळतील असा दावा देखील त्यांनी केला.

हेही वाचा : 

The post शिवसेना जात्यात असून इतर पक्ष भाजपाच्या सुपात आहेत : अनंत गीते appeared first on पुढारी.