शिवसेनेकडून नियमांचे उल्लंघन; काँग्रेसची वादात उडी, महापौरांचा आक्रमक पवित्रा 

नाशिक :  भाजपने (ता.२५) पलटवार करताना शिवसेना सदस्यांचे बंदिस्त पाकिटाऐवजी खुले पत्र आल्याने सेना सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करत कोंडीत पकडले आहे.

शिवसेनेकडून नियमांचे उल्लंघन

भाजपच्या चार सदस्यांचे राजीनामे न घेतल्याने स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याची तक्रार करणाऱ्या शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांना महापौर सतीश कुलकर्णी यांनी देखील बंद पाकिटाऐवजी खुले पत्र आल्याने सेना सदस्यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा टोला लगावला असून, नगरसचिवांनी देखील खुल्या पत्रासंदर्भात लेखी खुलासा दिला आहे. 

महापौरांचा आक्रमक पवित्रा
स्थायी समिती सदस्य नियुक्तीनंतर शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर यांनी भाजपच्या चार सदस्यांचे राजीनामे न घेतल्याने नियुक्ती बेकायदेशीर असल्याची तक्रार करताना नियुक्ती रद्द करण्याची मागणी करत भाजपला कोंडीत पकडले होते. भाजपने आज (ता.२५) पलटवार करताना शिवसेना सदस्यांचे बंदिस्त पाकिटाऐवजी खुले पत्र आल्याने सेना सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करत कोंडीत पकडले आहे. नगरसचिव राजू कुटे यांनी देखील बंद लिफाफ्याऐवजी खुल्या पत्राने शिवसेना सदस्यांची नावे आल्याचे पत्र महापौरांना सादर केल्याने कायदेशीररित्या शिवसेनेला कोंडीत पकडण्याची चाल भाजपने खेळली आहे. या पत्राचा आधार घेऊन शासनानेच कारवाई करावी, अशी मागणी महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

काँग्रेसची वादात उडी 
स्थायी समिती सदस्यांच्या वादात भाजप-शिवसेना राजकीय सामना रंगला असताना त्यात आता कॉंग्रेसने देखील उडी घेतली आहे. स्थायी समितीवर शिवसेनेचा एक अतिरिक्त सदस्य व नवीन आठ सदस्य नियुक्तीचा प्रस्ताव असताना अकरा सदस्यांची नियुक्ती का केली असा सवाल काँग्रेस गटनेते शाहू खैरे यांनी उपस्थित केला आहे. महापौरांच्या भूमिकेमुळे सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर, राहुल दिवे, समिना मेमन या पूर्वीच्या सदस्यांची नियुक्ती जुनी आहे की नवीन असा सवाल करताना खैरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे. 

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय!