शिवसेनेचा पुढील नाशिक जिल्हा प्रमुख कोण? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

सिडको (नाशिक) : शिवसेनेचे विद्यमान जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांच्या गळ्यात विधान परिषदेच्या आमदारकीची माळ पडल्याची चर्चा असल्याने आता नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचा पुढील जिल्हाप्रमुख कोण? याबाबत बरेच तर्कवितर्क लढविले जात आहे. यात काही नावे पुढे येत असून याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. तर काहीजण आपआपल्या परीने "मातोश्री"च्या दरबारी फिल्डिंग लावण्यासाठी व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हाप्रमुख पदासाठी फिल्डिंग लावण्यात व्यस्त

शिवसेनेचे एकनिष्ठ म्हणून ओळख असलेले विजय करंजकर यांच्या गळ्यात विधानपरिषदेची माळ पडल्याची चर्चा आहे. याबाबत अद्यापपर्यंत अधिकृत घोषणा जरी झाली नसली, तरी मात्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव मात्र सुरू झाल्याचे सोशल मीडियावर त्या माध्यमातून दिसून येत आहे. त्यामुळे आता नवीन शिवसेना जिल्हा प्रमुख पदासाठी संपर्कप्रमुख यांच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू झाली असून याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. तर पक्षातील काही उच्चपदस्थ शिवसेना पदाधिकारी आपआपल्या परीने शिवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी फिल्डिंग लावण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी नाशिक म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख सर्वश्रुत आहे. बाळासाहेबांचे नाशिकवर पहिल्यापासून घनिष्ठ प्रेम होते. त्यामुळे येथे बाळासाहेबांची सभादेखील सगळ्यात मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत होते.

आमदारकीची माळ गळ्यात पडणार असल्याची चर्चा

शिवसेनेने नाशिक मधील बहुतांश तळागाळातील शिवसैनिकांना जिल्हाप्रमुख, महापौर, जिप अध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री पद बहाल केल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाला येथे फार मोठे महत्त्व आहे. याकरिता जो - तो आपआपल्या परीने प्रामाणिकपणे व एकनिष्ठतेने काम करताना दिसून येतो. विद्यमान शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेची आमदारकीसाठी शिफारस करण्यात आल्याचे बोलले जात असून लवकरच त्यांना आमदारकीची माळ गळ्यात पडणार असल्याची चर्चा एकाला मिळत आहे.

शिवसैनिकांत चर्चांना उधाण

याबाबत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव देखील सुरू झाला आहे. त्यामुळे शिवसेनेचा पुढील जिल्हाप्रमुख कोण? या चर्चांना सध्या शिवसैनिकात उधाण आले आहे. त्यामध्ये काही नावे विशेष करून पुढे येत असून जो - तो आपआपल्या परीने फिल्डिंग लावताना दिसून येत आहे. सध्यातरी जोपर्यंत विधान परिषदेची आमदारकी जाहीर होत नाही, तोपर्यंत सर्वजण "होल्ड"वर असतील यात शंका नाही?

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 

पदासाठी पुढील काही नावांचा विचार होऊ शकतो?

नगरसेवक सुधाकर बडगुजर (सिडको)
नगरसेवक अजय बोरस्ते (नाशिक)
नगरसेवक विलास शिंदे ( गंगापूर )
शिवाजी चुंभळे ( गौळणे / सिडको )
सचिन मराठे ( जुने नाशिक )
महेश बडवे ( पंचवटी )
मामा ठाकरे ( राणे नगर )
प्रवीण तिदमे (गोविंद नगर )
दीपक दतीर (अंबड )

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल