शिवसेनेचे नगरसेवक इगतपुरीच्या सहलीवर! शिवसेनेला स्वत:च्या नगरसेवकांचीच भीती?

नाशिक : स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांवर डोळा ठेवणाऱ्या शिवसेनेला स्वत:च्या नगरसेवकांचीच भीती वाटू लागल्याने अखेरीस इगतपुरी येथील एका हॉटेलवर सुरक्षितस्थळी स्थायी समिती सदस्यांची सहल घडवून आणली आहे.

बहुमत असूनही सत्तेसाठी कसरत

सभापतिपदाच्या निवडणुकीपर्यंत पाच सदस्य ताब्यात राहतील. दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणून सर्व नगरसेवकांना एकत्र करण्यात आल्याचा दावा केला असला तरी भाजपचे आठ, मनसेचा एक असे एकूण नऊ सदस्य भाजपकडे आहेत. महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपला नाकीनऊ आणले होते. बहुमत असूनही सत्तेसाठी कसरत करावी लागली होती. अखेरच्या क्षणी बाहेर पडलेले नगरसेवक हाती लागल्याने भाजपला पुन्हा सत्ता मिळविता आली. त्यानंतर आता स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूकही त्याच दिशेने चालल्याची चिन्हे आहेत. मात्र, महापौरपदाच्या निवडणुकीपेक्षा स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक भाजपला सोपी आहे. तौलनिक संख्याबळानुसार भाजपचा एक सदस्य कमी करून शिवसेनेचा एक सदस्य अतिरिक्त नियुक्त करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली.

हेही वाचा - लग्नबेडीपुर्वीच हाती पडल्या पोलिसांच्या बेड्या! नवरदेवाचे ते स्वप्न अपुरेच..

शिवसेनेचे सदस्य सहलीला रवाना

त्यानुसार भाजपकडे आठ, तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचे मिळून आठ सदस्य आहेत. समसमान पक्षीय बलाबल झाल्याने स्थायी सभापतिपदाची निवडणूक रंजक स्थितीत आली आहे. महापौर निवडणुकीप्रमाणे दगाफटका होऊ नये, म्हणून भाजपने नियुक्तीच्या आदल्या दिवशीच नगरसेवक अहमदाबाकडे रवाना केले. त्यानंतर शिवसेनेने पाच सदस्य सायंकाळी इगतपुरी येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षितस्थळी पोचविले. सायंकाळी शिवसेना भवन येथून शिवसेनेचे सदस्य सहलीला रवाना झाले. 

 हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

भाजपकडे बहुमताएवढे संख्याबळ 
शिवसेनेने सदस्य रवाना करताना महाविकास आघाडीचे नगरसेवकही बरोबर असल्याचा दावा केला. मात्र, भाजपकडे मनसेचा एक सदस्य यापूर्वीच असल्याने बहुमताएवढे संख्याबळ झाले आहे. यामुळे शिवसेनेला राजकीय करामत करण्यास जागा ठेवली नसल्याचे बोलले जात आहे.