शिवसेनेच्या सिडकोत भाजपकडून सुरुंग; भाजपकडून आठपैकी पाच पदे

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या सिडको गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली असून, रणनीतीचा भाग म्हणून विषय समित्यांवर सिडको विभागाला झुकते माप देण्यात आले. चार विषय समित्यांच्या सभापती, उपसभापती अशी आठपैकी पाच पदे या विभागाला देत नाराजी दूर करतानाच, शिवसेनेला टक्कर देण्याची खेळी केली आहे. 

भाजपकडून आठपैकी पाच पदे सिडको विभागाला 
महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीच्या प्रचारात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केल्यानंतर नाशिककरांनी भरभरून मतदान करताना भाजपला बहुमताच्या पलीकडे नेले. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच बहुमताने सत्ता स्थापन करणारा भाजप हा पहिला पक्ष ठरला. आतापर्यंत महापालिकेत सत्ता स्थापन करताना कधी अपक्ष, तर कधी छोट्या पक्षांचा टेकू घेण्यात आला होता. यंदाची पंचवार्षिक निवडणूक अपवाद ठरली. १२२ पैकी भाजपचे तब्बल ६५ नगरसेवक निवडून आले. पंचवटी विभागात सर्वाधिक निवडून आले. त्याखालोखाल पूर्व, नाशिक रोड भागात भाजपची ताकद वाढली. 
सातपूर विभागात नगरसेवकांची संख्या वाढली; परंतु प्रभाग समितीची सत्ता मिळविण्यासाठी कधी मनसे, तर कधी अपक्षांचा टेकू घ्यावा लागतो. पश्‍चिम विभागातही हीच स्थिती असली तरी येथे मनसे, कॉंग्रेसकडून शिवसेनेच्या मदतीने सत्ता राखली जाते. नाशिक रोड विभागात पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाल्याने भाजपच्या हातून प्रभाग समितीची सत्ता गेली. पाच विभाग वगळता भाजपला सिडको प्रभागाची सत्ता मिळाली नाही. येथे सर्वाधिक नगरसेवक असल्याने शिवसेनेची सत्ता आहे. 

हेही वाचा - जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही​

सिडकोत ताकद वाढविण्याची रणनीती 
वैद्यकीय व आरोग्य समिती सभापतिपदी पुष्पा आव्हाड, तर उपसभापतिपदी नीलेश ठाकरे, शहर सुधार समिती सभापती छाया देवांग, तर उपसभापतिपदी अलका आहिरे, विधी समिती उपसभापतिपदी भाग्यश्री ढोमसे यांना संधी देण्यात आली. विषय समित्यांची आठपैकी पाच पदे सिडकोच्या पारड्यात टाकण्यात आल्याने येथे शिवसेनेला शह देण्याची व्यूहरचना आखण्यात आली आहे. विषय समित्यांचे सभापती, उपसभापतिपदाची मुदत एक वर्षासाठी राहणार आहे. त्यामुळे ही शेवटची संधी असून, जानेवारी २०२२ मध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने सिडकोतील नगरसेवकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मानला जात आहे. फेब्रुवारीत स्थायी समिती सभापती सदस्य व सभापतिपदाची निवडणूक होणार असून, तेव्हाही सिडकोला झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. आमदार सीमा हिरे यांनीदेखील विषय समित्यांसाठी सिडकोतील नगरसेवकांना संधी देण्याची मागणी केली होती. गुरुवारी (ता. १०) सभापतिपदाची निवड होईल. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळले