शिवसेनेत संघटनात्मक पातळीवर फेरबदलाचे संकेत; शहर-जिल्ह्यात लक्ष केंद्रित

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरासह ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रित करताना संघटनेत बदल केले जाणार असून, जिल्हाप्रमुख व महानगरप्रमुख या महत्त्वपूर्ण पदात बदलाचे संकेत देण्यात आले आहेत. जबाबदारीचे वाटप करताना नवीन व्यक्तीकडे पदाची जबाबदारी देऊन पक्षात नव्याने दाखल झालेल्या व्यक्तींचा विश्‍वास दृढ करण्याचा भाग मानला जात आहे. 

नव्या दमाने नागरिकांसमोर जाण्यासाठी बदलाचे संकेत

२०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला नाशिककरांनी पूर्ण बहुमताने निवडून दिले. त्या वेळी शिवसेनेला बहुमताच्या अपेक्षा होत्या. भाजपचे ६५, तर शिवसेनेचे ३६ नगरसेवक निवडून आले. प्रमुख विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तेत बसावे लागले. भाजपच्या ६५ नगरसेवकांमध्ये बहुतांश नगरसेवक नवखे, तर शिवसेनेचे नगरसेवक विरोधी बाकावर बसले. तरी अनुभवी नगरसेवकांची मोठी फळी असल्याने सत्ताधारी भाजपला विरोधकांसमोर अनेकदा माघार घ्यावी लागली. निवडणुकीतील पराभवाचे शल्य शिवसेनेला कायम बोचत राहिले. निवडणुका होताच संघटनेत मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले. फेरबदलाच्या प्रक्रियेत पक्षात तरुणांकडे नेतृत्व देण्याच्या उद्देशाने बदल करण्यात आला; परंतु काही वर्षांत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये फारकतीचे नाते राहिले. कुठलाही ठोस कार्यक्रम नाही, पक्ष कार्यालयात फक्त जयंती, पुण्यतिथीला हार घालण्यापुरतेच नेतृत्व राहिले. महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून सक्षम बाजू मांडत असताना संघटनापातळीवर किंवा रस्त्यावर उतरून सत्ताधारी भाजपविरोधात एकही आंदोलन झाले नाही. संघटनेला निर्जीव स्वरूप प्राप्त झाल्याने शिवसैनिकही दुरावल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वरिष्ठ पातळीवर पोचल्या. राज्याच्या राजकारणात शिवसेना व रस्त्यावरचे आंदोलन हे सूत्र कायम राहिले आहे; परंतु नाशिकमध्ये काही वर्षांत हे राजकीय सूत्र विस्कटले. त्यामुळे निवडणुकीच्या एक वर्ष आधी संघटनेत बदल करून नव्या दमाने नागरिकांसमोर जाण्यासाठी बदलाचे संकेत नाशिकमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले संपर्कनेते खासदार संजय राऊत यांनी दिल्याचे समजते. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

जिल्हाप्रमुखपदात बदल 

राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी नुकतीच राज्यपालांकडे सादर करण्यात आली. त्यात जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना संधी देण्यात आली. राज्यपालांनी आमदारांची नावे जाहीर केली नसली तरी आज ना उद्या ती करावीच लागणार आहे. करंजकर यांना संधी मिळाल्याने जिल्हाप्रमुखपदावर अनेक नावे चर्चेत आली आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही २०२२ च्या सुरवातीला होणार असल्याने त्या दृष्टीने तयारी केली जाणार आहे; परंतु आमदार असलेली व्यक्ती जिल्हाप्रमुखपद अधिक सक्षमतेने सांभाळू शकते, असा सूर पदाधिकाऱ्यांनी लावल्याने त्या दृष्टीनेही बदल करताना विचार केला जाणार आहे. 
हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा