Site icon

शुभांगी पाटील यांनी उद्धव ठाकरे व माझ्याशी संपर्क साधलाय, उद्या अंतिम निर्णय होईल

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कॉंग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली असताना अर्ज दाखल न केल्यामुळे नाशिकमध्ये पेच निर्माण झाला आहे. कॉंग्रेसने नाशिक पदवीधर मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांवर कारवाई केल्याने आघाडीचा उमेदवार कोण याबाबत चर्चा निर्माण झाली आहे. दरम्यान अपक्ष महिला उमेदवार शुभांगी पाटील यांनी उध्दव ठाकरे आणि माझ्याशी संपर्क साधला आहे. त्यामुळे यावर उद्या अंतिम निर्णय होईल अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

कॉंग्रेसकडून नाशिकमध्ये डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली मात्र त्यांनी अर्ज भरला नाही. हा अर्ज न भरण्यामागे काय कारण आहे हे फक्त डॉ. सुधीर तांबेच सांगू शकतील असेही अजित पवार म्हणाले.

तीन टर्म आमदार असल्याने या जागा वाटपावर चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीतील नेते एकमेकांशी चर्चा करत होते. आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशीही चर्चा झाली होती. आताही ते सतत फोनव्दारे संपर्कात आहेत. मात्र नाशिक येथे काहीतरी गडबड आहे याची कुणकुण लागली होती आणि याची कल्पना कॉंग्रेसच्या वरीष्ठांना दिली होती असेही अजित पवार यांनी सांगितले.

या जागा वाटपावर भाजप बोलत आहे. भाजपला संधी मिळाली आहे म्हणून बोलत आहेत मात्र त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. आम्ही बसून योग्य तो मार्ग काढला होता मात्र अर्ज न भरल्याने प्रश्न निर्माण झाला आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

The post शुभांगी पाटील यांनी उद्धव ठाकरे व माझ्याशी संपर्क साधलाय, उद्या अंतिम निर्णय होईल appeared first on पुढारी.

Exit mobile version