शेअर मार्केटच्या बहाण्याने गुंतवणुकदारांना ५२ लाखांना गंडा

fraud

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी शहरातील गुंतवणुकदारांना सुमारे ५२ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

रवींद्र संजय भागवत (३७, रा. सामनगाव रोड) यांच्या फिर्यादीनुसार, भामट्यांनी ७ मार्च ते २३ एप्रिलदरम्यान त्यांच्यासह इतरांना ५१ लाख ७२ हजार ३९४ रुपयांना गंडा घातला. भामट्यांनी त्यांना व्हॉट्सअपवरून संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले. फिनविझार्ड टेक्नॉलॉजी प्रा. लि. या स्टॉक मार्केट कंपनीचे ब्रोकर असल्याचे भासवून गुंतवणूकदारांना एफटीपीएल-पीएम या अॅपवरून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असल्याचे भासवले. त्यानुसार रवींद्र व इतरांनी भामट्यांना लाखो रुपये गुंतवण्यास दिले. मात्र, ठरल्याप्रमाणे भामट्याने गुंतवणूकदारांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणुकदारांनी सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हेही वाचा –