नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा; मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची जाहीर सभा बुधवारी (दि. 22) सकाळी नऊ वाजता शेणीत शिवारात होणार आहे. यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. सभेला होणारी गर्दी गृहीत धरून जवळपास दिडशे एकर जागेत वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सद्या महाराष्ट्रात ठीक ठिकाणी जाहीर सभा घेऊन आरक्षणाविषयी मराठा समाजामध्ये जनजागृती करीत आहे. आरक्षणासाठी त्यांनी आजवर राज्यात अनेक ठिकाणी सभा घेतलेल्या आहेत. त्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील नाशिक, इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातील हद्दीवरील केंद्रस्थानी असलेल्या शेणीत शिवारात जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. सभेचे नियोजन अंतिम टप्प्यात असून त्यादृष्टीने सद्या जय्यत तयारी सुरू असल्याचे चित्र येथे दिसून येते आहे. अंदाजे तीस ते पस्तीस एकर जागेत सभेचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती शेणीत येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव यांनी दिली.
अशी आहे वाहन पार्किंग व्यवस्था
सिन्नर तालुक्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी कडवा नदी जवळील बेलू व शेणीत शिवारात, इगतपुरीच्या दिशेने सभेसाठी येणाऱ्या वाहनांसाठी कोठुळे पेट्रोल पंपाच्या जवळ तर नाशिकरोड, देवळाली कॅम्प मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी लहवित दारणा नदी पुलाजवळ प्रशस्त पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे.
सभेच्या स्थळाची ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई, स्वच्छता केली जाते आहे. जागेचे सपाटीकरणाचे करण्याचे काम सुरू आहे. लवकरच काम पूर्ण होईल. मराठा बांधवासाठी सेवाभावी वृत्तीने पार्किंगच्या ठिकाणी पाण्याची व नाश्त्याची व्यवस्था आहे. नियोजनासाठी आतापर्यंत तीन ते चार हजार स्वयंसेवकांची नोंदणी झालेली आहे. अंदाजे चार ते पाच लाख मराठा बांधव सभेसाठी येऊ शकतात. संदीप जाधव, सामाजिक कार्यकर्ते
हेही वाचा :
- Israel-Hamas War News | इस्रायल-हमास युद्धात नागरिकांच्या मृत्यूचा तीव्र निषेध, संवादाने संघर्ष निवळू शकतो- पीएम मोदी
- पुणेकरांनी या दिवाळीत केली 25 हजार नव्या वाहनांची खरेदी
- Pune Drug case : ड्रग प्रकरणात आणखी दोघे अटकेत
The post शेणीत जरांगे पाटील यांच्या सभेची जय्यत तयारी appeared first on पुढारी.