शेतकरीविरोधी विधेयकाबाबत नाशिकमध्ये काँग्रेस सेवादल आक्रमक; पाहा VIDEO

नाशिक : केंद्रातील सत्तारूढ भाजप सरकारने आणलेल्या तिन्ही कृषी विधेयकांवर काँग्रेस सेवादलाने आक्रमक पावित्रा घेतला आहे. सेवादलाच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी (ता. 3) जिल्हाधिका-यांची भेट घेत थेट राष्टपती रामनाथ कोविंद यांना साकडे घालत हे विधेयक मागे घेण्याचे आवाहन निवेदनाद्वारे केले आहे.

घोषणाबाजीने दणाणले जिल्हाधिकारी कार्यालय परिसर

केंद्र सरकारने शेतीसंबंधी आणलेल्या तीन विधेयकांवरून पंजाब, हरियानासह देशातील अनेक राज्यातील शेतकरी संतप्त झाले असून विधेयकाविरोधात दिल्लीच्या सीमेवर गत तीन दिवसांपासून तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून काँग्रेस सेवादलासह शहर, जिल्हा काँग्रेसही या आंदोलनात सहभागी झाली होती. कार्यकर्त्याच्या घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. आंदोलनात सेवादलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर यांच्यासह माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, नगरसेवक शाहु खैरे, वत्सला खैरे, मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बबलू खैरे, हेमंत परदेशी, पोपटराव नागपुरे, शांताराम दुसाने, आकाश गरूड, माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यानंतर निवडक पदाधिका-यांच्या उपस्थितीत जिल्हाधिका-यांकडे निवेदन सादर करण्यात आले.

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची